'खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित...'; इफ्तार पार्टीमधील BJP नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला उत्तर

Maharashtra Politcs BJP Vs Raj Thackeray MNS: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकल्यावत अशी मागणी राज ठाकरेंनी केली असून राज ठाकरेंवर भाजपाने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. व्होट चोरीवरुन दोघे आमने-सामने आलेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2025, 09:58 AM IST
'खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित...'; इफ्तार पार्टीमधील BJP नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला उत्तर
मनसे आणि भाजपाची जुंपली (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Politcs BJP Vs Raj Thackeray MNS:  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी मतचोरीच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. 'सत्याचा मोर्चा'मधून विरोधकांनी आणि खास करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मतदारसंघांची नावं घेत कुठे कुठे दुबार मतदान झालं याबद्दलची माहिती जाहीर सभेत दिली. याला उत्तर देताना सोमवारी भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी अनेक मतदारसंघांमध्ये जिथे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेत तिथे कशाप्रकार मुस्लिमांनीच दुबार मतदान केलं आहे यासंदर्भातील आकडेवारी वाचून दाखवत हा 'व्होट जिहाद' असल्याचं म्हटलं आहे. आता याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजपा आणि मनसे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

Add Zee News as a Preferred Source

पाच मतदारसंघाची यादीच मांडली

आशिष शेलार यांनी मांडलेला मुद्दाच पुढे नेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी, "सांगा, ही मतचोरी आहे की व्होटजिहाद?" असं म्हणत एक यादी शेअर केली आहे. साटम यांनी, "महाराष्ट्रातील हे 5 मतदारसंघ पहा..." असं म्हणत यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये "धुळ्यात निवडणूक जिंकले 3831 मतांनी, इथे 45,797 मुस्लिम दुबार मते आहेत. तसेच बीडमध्ये 6553 मतांनी निवडणूक जिंकले असले तरी तिथे 67,679 मुस्लिम दुबार मते आहेत. अमरावतीत 19,731 मतांनी निवडणूक जिंकले. तिथे  28,245 मुस्लिम दुबार मते आहेत," असं म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे मुंबई उत्तर-मध्यची निवडणूक 16,514 मतांनी जिंकले असून इथे मुस्लिम दुबार मते 59,805 इतकी आहेत. त्याचप्रमाणे मुंबई उत्तर-पूर्वची निवडणूक 29,861 मतांनी जिंकले  असले तरी येथील मुस्लिम दुबार मतदान हे 38,744 इतके असल्याचं नमूद केलं आहे.

मनसेचा खोचक टोला

दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या आशिष शेलारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आशिष शेलार हे मुस्लिम बांधवांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचं दिसत असून सोबत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिसत आहेत. "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित साठम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा," असं म्हटलं आहे. सोबत देशपांडेंनी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस मतदारांची यादी जोडली आहे.

दरम्यान, आता हा वाद पुढे किती चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More