चिंता मिटली; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट

यापूर्वी राज्यातील ८५ टक्के लोक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येत होते. 

Updated: May 23, 2020, 10:14 PM IST
चिंता मिटली; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या लक्षात घेता शनिवारी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील सर्व नागरिकांना सरसकट  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत मोफत उपचार होतील. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नागरिकांना सरकारी रुग्णालयाच्या खर्चातच खासगी रुग्णालयात उपचार मिळतील. 

मुंबईच्या खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेच्या ताब्यात- जयंत पाटील

यापूर्वी राज्यातील ८५ टक्के लोक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येत होते. परंतु, आता सरकारने पांढरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील नागरिकांनाही या योजनेत सामावून घेतले आहे. आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास खाटा कमी पडू नयेत व बिगरकोरोना रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. ही योजना ३१ जुलै २०२० पर्यंत अंमलात राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Covid-19 : पांढऱ्या कार्डधारकांना देखील मोफत उपचार द्या, मनसेची मागणी