Manoj Jarange Slams Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देताना जरांगेंनी थेट अमित ठाकरेंच्या पराभवाचा उल्लेख करत टोला लगावला आहे.

Manoj Jarange Slams Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या आझाद मैदानामध्ये सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज रविवारी तिसरा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये या आंदोलनासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान राज ठाकरेंनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवरुन शनिवारी रात्री मनोज जरांगे पाटलांनीही खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलंय.
राज ठाकरेंनी शनिवारी मराठा आंदोलनासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता सूचक उत्तर दिलं. “माध्यमांच्या आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात. तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारला," असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज यांना जरांगे परत का आले? असा सवाल विचारला असता राज यांनी, "मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, असे सांगितले जात होते. मग मराठा आंदोलक परत का आले? या सर्व गोष्टींची उत्तरे केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात," असं म्हटलं. आता राज यांच्या या विधानाला मनोज जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.
एका खासगी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी थेट राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विधानसभेतील पराभवाचा उल्लेख करत टोला लगावला. राज ठाकरेंना सवाल करताना मनोज जरांगे पाटलांनी, "कधीपर्यंत भाजपाची री ओढणार आहात?" असा थेट सवाल केला. एवढ्यावर न थांबता मनोज जरांगे पाटलांनी, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. स्वतःचं पोरगंही निवडणुकीत पाडलं," असं टोला राज ठाकरेंना लगावला.
मनोज जरांगे पाटील यांना राज ठाकरेंचा सल्ला फारसा रुचलेला दिसत नाही. त्यांनी राज ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावरुन बोलताना, "आम्ही तुम्हाला विचारले का? तुम्ही आम्हाला सल्ला का देत आहात? तुम्ही भाजपाकडे गेलात, नंतर पुढे पाठिंबा काढून घेतला. तुम्ही ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय. तुम्ही हुशार राजकारणी असून विचार करून वागले पाहिजे," अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा टप्पा काय आहे?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी काय आहे?
मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 10 टक्के आरक्षण मिळावे आणि सर्व मराठ्यांना कृषिप्रधान कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन सरकारी नौकरी आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळावा.
राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाबाबत काय प्रतिक्रिया दिली?
राज ठाकरे यांनी 30 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यातील एका कार्यक्रमात सांगितले की, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात. त्यांनी मागील वेळी नवी मुंबईत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याचा दावा केला होता, मग आंदोलक पुन्हा का आले, याचं उत्तरही शिंदे देऊ शकतात, असं ते म्हणाले.