Mumbai University: मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर चेअर’ ची स्थापना, काय आहे याचा उद्देश? जाणून घ्या!

Mumbai University:  या चेअरद्वारे सामाजिक न्याय, समता आणि वंचितांचे सक्षमीकरण यावर संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 15, 2025, 07:21 PM IST
Mumbai University: मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर चेअर’ ची स्थापना, काय आहे याचा उद्देश? जाणून घ्या!
मुंबई विद्यापीठ

Mumbai University: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाला सन्मान देण्यासाठी मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर चेअर’ स्थापन होत आहे. यासाठी नवी दिल्लीत मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. या चेअरद्वारे सामाजिक न्याय, समता आणि वंचितांचे सक्षमीकरण यावर संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

चेअरचा उद्देश काय?

डॉ. आंबेडकर चेअरचा मुख्य उद्देश बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, समानता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या विचारांचा शैक्षणिक आणि धोरणात्मक पातळीवर प्रसार करणे आहे. शिक्षण, रोजगार आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रभावी धोरणांचा अभ्यास आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी करारावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. शिक्षण आणि सामाजिक जागरूकता ही समतेच्या निर्मितीची प्रभावी साधने असल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनीही या चेअरद्वारे बहुविषयक संशोधनाला प्रोत्साहन मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

बाबासाहेब हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि सिनेट सदस्य होते. त्यांच्या विचारांचा सन्मान म्हणून हे चेअर स्थापन होत असून, हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून सामाजिक परिवर्तनाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या चेअरद्वारे शिक्षणातील समावेशकता, वंचितांचे शैक्षणिक प्रगतीचे प्रवाह आणि रोजगारातील दरी कमी करण्यासाठी धोरणांचा अभ्यास होईल. एम.ए. सोशल पॉलिसी, बौद्ध अभ्यास यासारखे अभ्यासक्रम आणि डॉक्टरेट, पोस्ट-डॉक्टरेट संशोधन राबवले जाणार आहे. या चेअर अंतर्गत प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक आणि दोन डॉक्टरेट फेलो नियुक्त होतील. यासाठी वार्षिक ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. हे चेअर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधनाला चालना देईल आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेईल.

या कराराप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आणि दूरदृष्टी देशभर पोहोचविण्यासाठी डॉ. आंबेडकर फाउंडेशन सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि संस्थात्मक सहकार्य ही डॉ. आंबेडकरांच्या कल्पनेतील समानतापूर्ण आणि समावेशक समाजनिर्मितीची सर्वात प्रभावी साधने असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या आंबेडकर चेअर्सच्या माध्यमातून धोरणाधारित संशोधन, लोकजागृती आणि सामाजिक न्याय, समानता, वंचित घटकांचे सक्षमीकरण व संविधानिक मूल्यांवरील शैक्षणिक चर्चेला अधिक बळकटी देतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी शिक्षण, रोजगारयोग्यता आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणाशी निगडीत सार्वजनिक धोरण हे आंबेडकर चेअरचे प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे सांगितले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आणि त्यांच्या आधुनिक सामाजिक व कायदेशीर प्रश्नांशी निगडिततेवर बहुविषयक संशोधन प्रोत्साहित करण्यात विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगितले.

FAQ

१. मुंबई विद्यापीठातील ‘डॉ. आंबेडकर चेअर’ काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे?

‘डॉ. आंबेडकर चेअर’ हे मुंबई विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाला सन्मान देण्यासाठी स्थापन केले जाणारे अध्यासन केंद्र आहे. याचा उद्देश सामाजिक न्याय, समानता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या विचारांचा शैक्षणिक व धोरणात्मक पातळीवर प्रसार करणे आहे. शिक्षण, रोजगार आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रभावी धोरणांचा अभ्यास आणि कौशल्य विकासाला यात प्राधान्य दिले जाईल.

२. या चेअर अंतर्गत कोणते उपक्रम राबवले जातील?

चेअरद्वारे शिक्षणातील समावेशकता, वंचित घटकांचे शैक्षणिक प्रगतीचे प्रवाह आणि रोजगारातील दरी कमी करण्यासाठी धोरणांचा सखोल अभ्यास केला जाईल. याशिवाय, एम.ए. सोशल पॉलिसी, एम.ए. बौद्ध अभ्यास यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट संशोधन प्रकल्प राबवले जातील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन आणि शैक्षणिक देवाण-घेवाणीला प्रोत्साहन मिळेल.

३. या चेअरच्या स्थापनेसाठी कोणती व्यवस्था आणि निधी आहे?

डॉ. आंबेडकर चेअरच्या स्थापनेसाठी मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. चेअर अंतर्गत एक प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक आणि दोन डॉक्टरेट फेलो नियुक्त केले जातील. या उपक्रमासाठी वार्षिक ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे, ज्यामुळे संशोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More