महिलेच्या पित्ताशयात तब्बल २८४ खडे

बोरीवलीच्या फिनिक्स रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून हे पित्ताशयातील खडे काढण्यात आले

Updated: Oct 23, 2017, 11:26 PM IST
महिलेच्या पित्ताशयात तब्बल २८४ खडे title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत एका महिलेच्या पित्ताशयात तब्बल २८४ खडे आढळलेत. बोरीवलीच्या फिनिक्स रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून हे पित्ताशयातील खडे काढण्यात आले.

४२ वर्षीय श्रेया शिंदे यांच्या पित्ताशयात एक दोन नाही तर तब्बल २८४ खडे असतील याची थोडीही कल्पनाही त्यांना नव्हती. पाच सहा महिन्यांपासून थोडा फार त्रास त्यांना होत होता. मात्र, त्यावेळी किरकोळ औषधोपचारावर वेळ निभावून गेली.

आठवड्याआधी श्रेया शिंदे यांच्या पोटात दुखू लागलं. तसंच छातीत दुखणं आणि उलट्यांचा त्रासही त्यांना जाणवू लागला. सोनोग्राफीत त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं निदान झालं.

बोरीवलीच्या फिनिक्स रुग्णालयात श्रेया शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पित्ताशयातील २८४ खडे काढण्यात आले.

पित्ताशयातील हे खडे कोलेस्टेरॉलचे आहेत. जे प्रामुख्याने महिलांच्या पित्ताशयात होतात. मात्र, श्रेया शिंदे यांच्यावर आलेलं संकट एका अवघड शस्त्रक्रियेमुळे दूर झालंय.