शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे.
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे. याआधी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
याआधी उद्धव ठाकरे सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी २४ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर केली. यामध्ये ६८ गावांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या १५,३५८ शेतकऱ्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानुसार कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली.
आता दुसरी यादी २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.