Mumbai Crime News : मुंबईत होळीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबईत अनेक ठिकाणी होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अशाच एका होळी पार्टीत TV अभिनेत्रीचा विनयभंग झाला आहे. सहकलाकारानेच जबरदस्ती रंग लावत गैरवर्तन केल्याची तक्रार या अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या कलाकाराची चौकशी सुरु केली आहे.
14 मार्च रोजी मुंबईत रंगपंचमी साजरी झाली. जोगेश्वरी परिसरात आयोजीत करणाऱ्यात आलेल्या होळी पार्टीत 29 वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग झाला आहे. पीडित अभिनेत्रीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती एका मनोरंजन वाहिनीसोबत काम करत आहे. ज्या कंपनीत ती काम करते त्या कंपनीने होळी पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले होते असे अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले.
याच पार्टीत सोबत काम करणाऱ्या 30 वर्षीय सहकलाकारे विनभंग केल्याची तक्रार अभिनेत्रीने केली आहे. दारूच्या नशेत या अभिनेत्याने माझ्याशी गैरवर्तन केले. मला त्याच्यासह होळी खेळण्याची इच्छा नसताना त्याने मला पकडून जबरदस्तीने माझ्या गालावर रंग लावला मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकाराबाबत मी माझ्या मित्र मैत्रिणींना सांगितले असता त्यांनी त्याला जाब विचारला मात्र, त्याने त्यांना देखील धक्काबुकी केल्याचे अभिनेत्रीने तक्रारीत म्हंटले आहे.
या प्रकरणी अंधेरीच्या अंबोली पोलिस ठाण्यात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. बीएनएसच्या कलम 75(1)(i) अंतर्गत आरोपी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बाजवून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवले आहे.