कबुतरांमुळे मुंबईला लागणार ब्रेक? दिवाळीचा उल्लेख करत जैन समाजाचा अल्टीमेटम; 'हिंदू धर्मात...'

Kabutar Khana Issue Jain Community Warning: मुंबईमधील कबुतरखाना प्रकरण शांत झाल्याचं वाटत असतानाच आता जैन समाजाने एक इशारा दिलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2025, 08:08 AM IST
कबुतरांमुळे मुंबईला लागणार ब्रेक? दिवाळीचा उल्लेख करत जैन समाजाचा अल्टीमेटम; 'हिंदू धर्मात...'
जैन समाजाने पत्रकार परिषदेतून दिला इशारा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य पीटीआय)

Jain Community Warning: मुंबईमधील कबुतरखाना बंदी (Kabutar Khana Issue) प्रकरण दिवाळीनंतर पुन्हा तापण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जैन समाजाच्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर केलेल्या कारवाईवरुन काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील दादर परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा विषय आता संपला अस वाटत असतानाच आता जैन समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

11 ऑक्टोबर रोजी धर्मसभेचं आयोजन

कबुतरांना न्याय देण्यासाठी कोणती रणनीती आखायची, हे ठरविण्यासाठी दादर येथे 11 ऑक्टोबर रोजी धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार, राज्य शासनाने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. त्यांनतर, महापालिकेने कबुतरखान्यांविरोधातील कारवाई सुरु केली. मात्र कबुतरखाने बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अद्यापही जैन समुदायाकडून विरोध होत आहे. यापुढेही हा विरोध अधिक तीव्र करण्याचा जैन समाजाचा मानस आहे. 

गायी आणि कबुतरांची तुलना

केवळ कबुतरांमुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला नाही. अन्य प्राण्यांमुळेही त्यांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. मात्र, केवळ कबुतरांवरच अन्याय का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत जैन समाजाकडून उपस्थित करण्यात आला. तसेच, हिंदू धर्मात गाईंना जसा मान आहे, तसाच जैन धर्मात कबुतरांना आहे. त्यामुळे कबुतरांना न्याय मिळालाच पाहिजे. यापूर्वी अनेक वेळा याबाबत प्रयत्न करण्यात आले.

...तर दिवाळीनंतर रस्त्यावर उतरुन आंदोलन

पर्युषण काळात सरकारने कबुतरखान्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आता धर्म सभा आयोजित करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. प्रश्न सुटला नाही तर दिवाळीनंतर आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात येईल, अशी माहिती माजी नगरसेवक पुरण दोशी यांनी दिली.

मुंबईकर कर देतात असं म्हणत केली 'ही' मागणी

कबुतरांच्या विष्ठेतून आजार पसरत असतील तर महापालिकेने दिवसातून तीन ते चार वेळा कबुतरखान्यांची स्वच्छता करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले पाहिजेत. मुंबईकर त्यासाठी पालिकेला कर देतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी शेरी ऍन्ड दिया फाउंडेशनचे राकेश कोठारी, जिसो फाउंडेशनचे सुरेश पुरनिया, महेंद्र जैन, निलेश चंद्रमुनी आदी उपस्थित होते.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More