)
Mumbai Price Hike News : मागील काही दिवसापासून भारतामध्ये सातत्यानं काही दैनंदिन वापरातील गोष्टींचे दर वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ही वाढ सुरुवातीला किरकोळ वाटत असली तरीही ती इथंच थांबणार की येत्या काळात किमती आणखी वाढणार? हाच प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. पेट्रोल- डिझेल, सीएनजी आणि दुधाच्या दरांमागोमाग आता दर दिवशी अनेकांच्याच नाश्त्याच्या स्वरुपात आहाराचा भाग असणारा ब्रेडसुद्धा महागला आहे. त्यामुळं आता नाश्त्यातून ब्रेडही कमी करायचा का? याच पेचात अनेक मंडळी पडले आहेत.
मुंबईतील काही ब्रेड उत्पादन कंपन्यांनी सरसरकट ब्रेडच्या एका पाकिटामागे 5 रुपये वाढवले आहेत. त्यामुळं इतरही कंपन्या येत्या काळात ब्रेडचे दर वाढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईल दरवाढ लागू करणारी ब्रेड उत्पादक कंपनी आहे, मॉडर्न. या कंपनीनं काही सामान्य उत्पादनांच्या किमतीतसुद्धा दरवाढ लागू केली आहे. TOI च्या वृत्तानुसार 16 मे पासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून, आता मागोमागच ब्रिटानिया, विब्ससुद्धा ब्रेडच्या किमती वाढवतात का? हे पाहणं, महत्त्वाचं असेल.
वडापाव, मिसळपाव ते अगदी मुंबईची लोकप्रिय पावभाजी अशा पदार्थांचा प्राण असणारा लादीपावसुद्धा महागला आहे. 6 पावांच्या एका लादीमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आता सामान्यांच्या खिशाला परवडणारे, चव आणि भूक भागवणारे मुंबईकरांच्या आवडीचे पदार्थसुद्धा महागणार ही बाब नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईत दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता लादी पाव आणि ब्रेडच्या किमतीसुद्धा वाढवण्यात आल्यानं नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम दिसणार आहे. या दरवाढीमागे, कच्च्या मालासाठी होणारा वाढीव खर्च हे मूळ कारण सांगण्यात येत आहे.
| ब्रेड | आधीची किंमत |
आताची किंमत |
| 400 ग्रॅम सँडविच ब्रेड | 40 | 50 |
| Whole wheat | 55 | 60 |
| मल्टीग्रेन ब्रेड | 60 | 65 |
| मल्टीग्रेन ब्रेड | 28 | 30 |
| पांढरा ब्रेड | 20 | 22 |
| ब्राऊन ब्रेड | 45 | 50 |
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांवर मध्य पूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षासह डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत या साऱ्याचा थेट परिणाम मुंबईतील खाद्यसंस्कृतीवर दिसून येत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळं आधीच हॉटेल, रेस्तराँ, खानावळी आणि फास्ट फूड व्यवसायात अनेक पदार्थ मेनूकार्डवरून दिसेनासे झाले आहेत. तर, काही आस्थापनांनी पदार्थांच्या किमती 5 ते 20 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
मिसळ-पाव, वडा-पाव, बिर्याणी, डोसा, थाळी, चहा, कॉफी, फ्राईड राईस, नूडल्ससह विविध फास्ट फूड पदार्थांचे दर वाढण्यासोबतच काही ठिकाणी पार्सल आणि होम डिलिव्हरीसाठीच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरापासून ते अगदी या शहरात हातावर पोट असणाऱ्यांनाही भूक भागवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार हीच वस्तूस्थिती समोर येत आहे.