Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' पाच स्थानकांतील लोकल थांबा रद्द; जाणून घ्या मेगा ब्लॉकचे तपशील

Mumbai Mega Block: मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर 11 जानेवारी रोजी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सगळ्या कामांचे आधीच नियोजन करून बाहेर पडा नाहीतर गैरसोय होईल. सगळे तपशील जाणून घ्या.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 10, 2026, 09:37 AM IST
Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' पाच  स्थानकांतील लोकल थांबा रद्द; जाणून घ्या मेगा ब्लॉकचे तपशील

Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दर रविवारप्रमाणे यंदाही मुंबई लोकलचा मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे.  सेंट्रल रेल्वेने शुक्रवारी जाहीर केले की रविवारी, 11 जानेवारी रोजी मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, त्यामुळे अनेक लोकल गाड्या वळवण्यात येणार, रद्द राहणार किंवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source

मेन लाईनवरील ब्लॉक

मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन स्लो लाईनवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक राहणार आहे.

डाऊन स्लो लोकलमध्ये बदल

ब्लॉक कालावधीत सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान CSMT मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन स्लो लोकल गाड्या CSMT ते विद्याविहार दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या भायखळा , परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि नंतर विद्याविहार येथे पुन्हा स्लो लाईनवर आणण्यात येतील.

अप स्लो लोकलमध्ये बदल

त्याचप्रमाणे, सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 दरम्यान घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो लोकल गाड्या विद्याविहार ते CSMT दरम्यान अप फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद

ट्रान्स-हार्बर लाईनवर ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहेत.

रद्द राहणाऱ्या लोकल सेवा

ब्लॉक कालावधीत खालील लोकल गाड्या रद्द राहतील—

ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन लोकल (सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 दरम्यान)

पनवेल, नेरूळ आणि वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप लोकल (सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 दरम्यान)

प्रवाशांसाठी सल्ला

सेंट्रल रेल्वेने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि या मेगा ब्लॉकदरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हा ब्लॉक उपनगरीय रेल्वे सेवांच्या सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More