मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलमधील गर्दी कमी होणार, स्वतः रेल्वेमंत्र्यांनीच दिले संकेत

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आता आणखी आरामदायी आणि सोपा प्रवास होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 18, 2025, 11:54 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलमधील गर्दी कमी होणार, स्वतः रेल्वेमंत्र्यांनीच दिले संकेत
Mumbai local train update Mumbai suburban trains soon feature new designs for better comfort and less overcrowding

Mumbai Local Train Update:  लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो लोक लोकलमधून प्रवास करतात. पश्चिम, मध्य आणि हार्बर असे तीन प्रमुख मार्गावरुन लोकलची वाहतूक होते. वसई-विरार, कल्याण-डोंबिवली तर पनवेलवरुनही नागरिक मुंबईत येतात. त्यामुळं लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. 

मुंबईसाठी लवकरच 238 नवीन लोकल धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानंतर गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या या मागणीवर रेल्वेकडून गांभीर्याने विचार सुरू होता. आता केंद्रीय मंत्र्यांनी देखील याबाबत विचार करत मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 गाड्या तयार करण्यात येत असल्याचे म्हटलं आहे. राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

 रेल्वेमंत्री काय म्हणाले

मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 नव्या गाड्या तयार करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. मुंबईत जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती राज्यसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

पनवेल - कर्जत रेल्वे मार्गाचे काम जोरात

पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर असून शनिवारी त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळाले. या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला 'एंड अनलोडिंग रेक' चालविण्यात आला.  २६० मीटर लांब आणि ६० किलो वजन असलेल्या रेल पॅनेलची वाहतूक एंड अनलोडिंग रेकच्या माध्यमातून करण्यात आली. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. या रेकचा वापर करून पनवेल-कर्जत मार्गामध्ये लांब वेल्डेड रेल ट्रॅक बसविले जाणार आहेत. याआधी मध्ये रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात मिळविलेल्या रेकचा वापर करून मोहोपे - चिखलेदरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण केले होते. आता डिझाइन केलेले रेक आल्यानंतर, नवीन ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.