मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवर होतेय आणखी एक रेल्वे मार्गिका, कर्जतकरांचा प्रवास होणार सोप्पा

Mumbai Karjat Local Train Update: कर्जत-पनवेलसाठी नवी मार्गिका होणार आहे. त्यानंतर प्रवाशांचा प्रवास आणखी सोप्पा आणि जलद होणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकेचा प्रस्ताव रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2025, 09:05 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवर होतेय आणखी एक रेल्वे मार्गिका, कर्जतकरांचा प्रवास होणार सोप्पा
mumbai local train update Panvel–Karjat Fourth Railway Line Approved Boost Navi Mumbai Airport Access

Mumbai Karjat Local Train Update: मुंबईतील गर्दी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यासोबतच मुंबई लोकलची गर्दीदेखील वाढत आहे. त्यामुळं लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. मुंबईत जशी गर्दी वाढते तशीच मुंबईलगतच्या शहरांची प्रगतीदेखील झपाट्याने वाढत आहे. मुंबईत घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. त्यामुळं अनेक सर्वसामान्य नागरिकांनी मुंबईलगतच्या ठाणे, डोंबिवली आणि कर्जत, पनवेल या शहरांत घर घेतले आहेत. त्यामुळं कामानिमित्त येण्यासाठी लोकल हाच एक पर्याय आहे. अशावेळी लोकलच्या गर्दीमुळं अनेक प्रवाशांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतो. अशावेळी  पनवेल-कर्जत दरम्यान २९ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी 491 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत-पनवेल अशा शहरांकडे नागरिकांचा ओढा अधिक आहे. भविष्यातील गरजा ओळखून मध्य रेल्वेने कर्जत-पनवेलदरम्यान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर नव्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे. महामुंबईतील रेल्वे जाळे वाढवून प्रवाशांना आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी कर्जत ते पनवेलदरम्यान एक नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत (चौक) दरम्यान 29 किमीची रेल्वे मार्गिकेसाठी 491 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे मंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सध्या कर्जत ते पनवेलदरम्यान एक मार्गिका कार्यरत आहे. याच मार्गावरून अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेसची वाहतूक होते. तर नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम 71 टक्के पूर्ण झाले आहे. मार्गादरम्यान पाच रेल्वे स्थानकांतील सेवा इमारतींच्या बांधणीसह कर्जत आणि पनवेल येथे उड्डाणपूल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नवी मुंबईत नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. नव्या विमानतळापासून पनवेल रेल्वे स्थानक केवळ 17 किलोमीटरवर आहे. विमानतळाला महामार्गासह मेट्रो आणि रेल्वे जोडणी देण्यात येणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकांमुळे याचा मोठा लाभ प्रवाशांना मिळेल.

कर्जत ते पनवेलदरम्यान असे आहेत रेल्वे मार्ग

पहिला मार्ग - अप व डाउन मेल-एक्स्प्रेससाठी सुरू
दुसरा आणि तिसरा मार्ग - 71 टक्के काम पूर्ण
चौथी मार्गिका - मध्य रेल्वेकडून प्रस्ताव सादर