ठाणेकरांना थेट CSMT गाठता येणार, समुद्राखालून धावणाऱ्या मेट्रोचे काम कुठपर्यंत आलं? अशी असतील स्थानके!

Mumbai Metro 11: वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो 11 साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू झाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: May 14, 2025, 10:06 AM IST
ठाणेकरांना थेट CSMT गाठता येणार, समुद्राखालून धावणाऱ्या मेट्रोचे काम कुठपर्यंत आलं? अशी असतील स्थानके!
mumbai metro 11 under sea tunnel work is started

Mumbai Metro 11: शहरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. शहरातील विविध भागांत मेट्रोच्या कामांना जोर आला आहे. वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो 11 साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. समुद्राचे पाणी नेमके किती खोलीवर आहे, हे तपासण्यासाठी जागोजागी ड्रीलिंगचे काम सुरू झाले आहे. या मेट्रोमुळं ठाणेकरांना थेट सीएसएमटीला पोहोचता येणार आहे. कशी आहे ही मेट्रो जाणून घेऊयात.

वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो 11 ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो 4 अ आणि मेट्रो 4ची विस्तारित मार्गिका आहे. ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी (सीएसएमटी) जोडण्यासाठी या मार्गिकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मार्गिका सीएसएमटीहून पुढे सर्कलखालून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समुद्राच्या पाण्याचा अभ्यास केला जात आहे. 

संबंधित सूत्रांनुसार, सीएसएमटी ते अपोलो बंदर या भागाचाच भू तंत्र तपासाच्याआधारे भूगर्भाचा अभ्यास केला जात आहे. या भागात जमिनीखाली समुद्राचे पाणी असण्याची शक्यता आहे, हे पाणी नेमक्या किती खोलीवर याचा अभ्यास होत आहे. त्यासाठी दर 500 मीटर अंतरावर दीड ते तीन मीटर खोल खड्डे खणले जात आहेत. तसेच, प्रत्येक स्थानकाच्या भागात तीन अतिरिक्त खड्डे 10 ते 20 मीटर खोल खणले जात आहेत. या मेट्रोसाठी भुयारी मार्ग तयार करताना बोगदा कुठून खणायचा, संबंधित भागाची भौगोलिक स्थिती, मातीचे नमुने, मातीची क्षमता, भूगर्भीय स्थिती याचा अभ्यास होत आहे. 

ही मार्गिका प्रारंभी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विकसित होणार होती. मात्र सध्या आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौकादरम्यान कार्यान्वित असलेली मेट्रो 3 ही भुयारी मार्गिका उभी करण्याचा मुंचई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) अनुभव आहे. त्यामुळे आता या मार्गिकाचे बांधकामदेखील एमएमआरसीएलच करणार आहे. अभ्यासदेखील अंतर्गतच होत आहे. संबंधित भूगर्भएमएमआरसीएल

कशी असेल मार्गिका

वडाळा, शिवडी, वाडी बंदर, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदरापर्यंत अशी ही मार्गिका धावणार आहे.