मुंबईकरांसाठी Bad News... मेट्रो मोठ्या निर्णयाचा तयारीत; सर्वसामान्यांना बसणार फटका! नेमका प्लॅन काय?

Mumbai Metro Ticket Price Hike: मुंबईमधील अनेक मार्गांवर मेट्रो सुरु झाली असून तिला चांगली पसंती मिळत असतानाच अचानक आता मेट्रोच्या तिकीटांचे दर वाढवण्याचा विचार सुरु असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2025, 07:10 AM IST
मुंबईकरांसाठी Bad News... मेट्रो मोठ्या निर्णयाचा तयारीत; सर्वसामान्यांना बसणार फटका! नेमका प्लॅन काय?
यासंदर्भातील हलचालींना सुरुवात झाली आहे (प्रातिनिधिक फोटो)

Mumbai Metro Ticket Price Hike: राज्य सरकारने अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडेदरात पुढील काही महिन्यांत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Add Zee News as a Preferred Source

'सॉल्ट पॅन' विभागाकडे पाठविला प्रस्ताव

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे ऑगस्टमध्ये पाठविला होता. राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने समिती गठित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव गेल्या महिन्यातच केंद्र सरकारच्या 'सॉल्ट पॅन' विभागाकडे पाठविला. त्यामुळे एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या काळात अधिक भाडे भरावे लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे.

कोणत्या मेट्रोचे भाडे वाढणार?

अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो 2 अ - 18.6 किमी लांबी

गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 - 16.5 किमी लांबी

अन्य मेट्रोंच्या तुलनेत एमएमआरडीए मेट्रोचे भाडे किती?

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर सर्वाधिक भाडे आकारले जात आहे. मेट्रो 3 वर 8-12 किमी अंतरासाठी 40 रुपये भाडे आकारले जाते. त्याचवेळी एमएमआरडीएच्या मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर प्रती 3-12 किमीसाठी 20 रुपये भाडे आकारले जाते. मेट्रो 1 वर 8 ते 11.4 किमी अंतरासाठी 40 रुपये आकारले जाते. भाड्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे त्याची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच भाडेवाढ लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

नक्की पाहा >> गर्दीच गर्दी... मेट्रो-3 ने मोडला रेकॉर्ड! पहिल्या दिवसाची प्रवासी संख्या पाहून बसेल धक्का

भाडेवाढीची शक्यता का?

एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) 35.1 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाते. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्यस्थितीत दरदिवशी 3 लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जातो. या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी त्यांच्यावरून 9 लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित प्रवासी संख्येपासून या मेट्रो अजून दूर आहेत. परिणामी मेट्रोला उत्पन्नही मर्यादित मिळत नसून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मुंबई महानगरातील अन्य मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More