ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा! 3 नेत्यांवर बोलणीची जबाबदारी, शिक्कामोर्तबासाठीचा मुहूर्तही ठरला?

BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी सगळंच स्पष्ट होणार. सातत्यानं होणाऱ्या बैठकी अखेर निकाली निघण्याच्या वाटेवर. 'मनसे' युतीकडे राज्याचं लक्ष...    

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 09:42 AM IST
ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा! 3 नेत्यांवर बोलणीची जबाबदारी, शिक्कामोर्तबासाठीचा मुहूर्तही ठरला?
Mumbai news big political news Shiv Sena Ubt Mns Alliance In Bmc Election Seat Sharing Formula Final

BMC Election News : महाराष्ट्रात सध्याच्या घडीला भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी हालचाली सुरू असल्या तरीही सर्वाधिक चर्चा होतेय ती मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या UBT या दोन्ही पक्षांमध्ये वाहणाऱ्या मनोमिलनाच्या वाऱ्यांची. काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी 'बात बहुत दूरतक गयी है...' असं वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या भेटीवरून पडला उचलला होता. ज्यानंतर आता राज्यातील या बहुप्रतिक्षित युतीचा मार्ग मोकळा झाल्याचं खात्रीशीर वृत्त  सूत्रांमार्फत मिळत आहे. इतकंच नव्हे, तर दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये आता थेट जागावाटपाची चर्चा सुरू आहे असंही म्हटलं जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कधी होणार युतीची अधिकृत घोषणा? 

सर्व राजकीय चर्चा आणि सूत्रांवरील विचारविनीमयाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर करताच दोन्ही पक्षांकडून युतीची अधिकृत घधोषणा केली जाईल. तत्पूर्वी जागावाटपाची सूत्र निर्धारित करण्यावर पक्षांचा भर असेल असं म्हटलं जात आहे. 

कोण आहेत चर्चेसाठी निवडलेले शिलेदार? 

मुंबईचा गड राखण्यासाठी महायुतीविरोधात उभ्या ठाकणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीनं आता राजकीय समीकरणं बदलणार हे तर स्पष्ट आहे. दरम्यान, BMC निवडणुकीसाठी उबाठा पक्षाच्या वतीनं प्रामुख्यानं वरुण सरदेसाई, अनिल परब आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असेल. विभागनिहाय जबाबदारीमध्ये ठाण्यात केदार दिघे, राजन विचारे; पुण्यात आदित्य शिरोडकर, वसंत मोरे यांच्यार जबाबदारी असेल. तर, मनसेकडून ही जबाबदारी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Video : 'कुठं जाऊन बसता...', भल्या पहाटे अधिकाऱ्यांची अजित पवारांकडून कानउघडणी

 

ठाकरेंच्या युतीत तिसरा घटक? 

नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार उबाठा आणि मनसे यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य युतीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचाही सहभाग असू शकतो. थोडक्यात हा या युतीचा तिसरा घटक असेल असं म्हटलं जात असून, त्या धर्तीवर चाचपणीलाही वेग आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. शरद पवार आणि राऊतांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनं याबाबतच्या चर्चांना आणखी वाव दिल्यानं आता सर्व चर्चांवर अधिकृत घोषणाच पूर्णविराम कधी देणार याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. 

उलटसुलट चर्चांनीही डोकं वर काढलं  

मागील काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच आता ठाण्यात 13 ऑक्टोबरला मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना UBT आणि मनसे एकत्रित शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अशातच दुसरीकडे आज मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेही एका मंचावर येणार आहेत. महेश मांजरेकर यांच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एका मंचावर येतील. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांनीही डोकं वर काढलं आहे. 

FAQ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना UBT यांच्यात युतीची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे?
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना UBT (उबाठा) यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या 'बात बहुत दूरतक गयी है...' वक्तव्याने ठाकरे बंधूंच्या भेटीवर चर्चा सुरू झाली.

युतीची अधिकृत घोषणा कधी होईल?
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. तत्पूर्वी जागावाटपाची सूत्रे निर्धारित करण्यावर भर असेल.

युतीत तिसरा घटक कोण असू शकतो?
नव्या माहितीनुसार, या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा सहभाग असू शकतो, जो तिसरा घटक ठरेल. शरद पवार आणि संजय राऊत यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीने याबाबत चर्चांना वेग आला असून, चाचपणीला गती मिळाली आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More