Job News : शैक्षणिक कारकिर्दीमध्ये पदवी शिक्षणाचा टप्पा अनेकांसाठीच महत्त्वाचा असतो. कारण हा तोच टप्पा असतो जिथून अनेकांसाठी पुढं नोकरीच्या संधी वाट पाहत असतात. अशाच या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असणाऱ्या मुंबई शहरातील एका प्रतिष्ठीत संस्थेच्या विद्यार्थ्यांना लाखोंचं वार्षिक पॅकेड असणारी दणदणीत पगाराची नोकरी लागली आहे.
आकर्षणाची बाब म्हणजे या संस्थेत यंदाच्या वर्षी 100 टक्के प्लेसमेंट झाली असून, यामध्ये अॅक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट अशा जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी विविध पदांवर निवडलं आहे. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अॅक्सेंचर या कंपनीनं 41 विद्यार्थ्यांना 45 लाख 37 हजार रुपयांचं पॅकेज दिलं आहे.
सरासरी 47 लाखांचे पगार या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिले असून, मायक्रोसॉफ्ट कंपनीनं दोन विद्यार्थ्यांना तब्बल 54 लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. आयआयएम मुंबई (IIM Mumbai) असं या शौक्षणिक संस्थेचं नाव असून, पवईतील इंन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग संस्थेचं साधारण दीज वर्षापूर्वी आयआयएममध्ये रुपांतरण झालं आणि तेव्हापासूनच इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. यंदाच्या वर्षी इथं कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी 198 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची रांग लागली होती. यामध्ये सर्वात कमी पकेजची ऑफर ही 18 लाख रुपयांची होती अशीही माहिती समोर आली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या प्लेसमेंटची संख्या 10 टक्क्यांनी वाढली असून या प्रक्रियेत नोकरीसाठी निवडलेल्या जवळपास 20 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीचा कोणताही अनुभव नाही. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पगाराच्या आकड्यात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
IIM Mumbai मध्ये यंदाच्या वर्षी हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या 130 टक्क्यांनी वाढली असून, रिटेल आणि ई कॉमर्स क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या 47.73 टक्के इतकी आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या प्लेसमेंटमध्ये आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाल्याची बाब नोंदवण्यात आल्यामुळं एकंदरच नोकरी क्षेत्रासह तरुणाईचा ओघ नेमका कोणत्या दिशेनं जात आहे याचाही अंदाज येत आहे.