)
Kurla Bus Accident : (Mumbai News) 2024 च्या डिसेंबर महिन्यात मुंबईतील कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बस अपघातप्रकरणी इलेक्ट्रिक बस चालवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाचं दार ठोठावण्यात आलं होतं. मात्र त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा मुद्दा मान्य करत अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून त्या अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयानं अनेकांच्या नजरा वळवल्या. नुकतीच याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
10 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिमे इथं असणाऱ्या एस. जी. बर्वे मार्गावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस तिथं असणाऱ्या अनेक वाहनांना जाऊन धडकली. फक्त वाहनं नव्हे, तर अनेक पादचाऱ्यांनाही बसनं चिरडलं, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू आणि 42 जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली.
सदर अपघातानंतर चालक प्रशिक्षण आणि देखरेखीसह तैनातीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कुर्ला बस अपघातानंतर बसचालक संजय मोरे यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘बेस्ट’ला या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं नसून त्याऐवजी दैनंदिन कामकाज, कामगार भरती आणि इतर जबाबदाऱ्या पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आलं. या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात या अधिकाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत हाच मुद्दा पुढे करत न्यायालयात युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर हे मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयानं अधिकाऱ्यांची आरोपमुक्तता केली.
अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी या प्रकरणातील निकाल देत ‘एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटिगंडला आणि ‘मोरया प्रायव्हेट लिमिटेड’चे सीईओ राम सूर्यवंशी यांना आरोपमुक्त केलं.
कुर्ला बस अपघात कधी आणि कुठे घडला?
हा अपघात 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पश्चिमे येथील एस. जी. बर्वे मार्गावर घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडकली.
अपघातात किती जणांचा मृत्यू आणि जखमी झाले?
अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 42 जण जखमी झाले. बसने अनेक वाहने आणि पादचारी चिरडले.
अपघातानंतर कोणावर गुन्हा दाखल झाला?
बस चालक संजय मोरे यांच्यासह इतर दोघांवर चालक प्रशिक्षण, देखरेख आणि तैनातीतील निष्काळजीपणाच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.