)
Elphinston Bridge : मुंबईतील ऐतिहासिक अशा पुलांपैकी एक असणाऱ्या या शहराच्या सेवेत शतकभराहून अधिक काळापासून मोठ्या दिमाखात उभ्या असणाऱ्या एल्फिन्स्टन पुलावरील वाहतूक काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. अस्सल आणि उत्तम दर्जाच्या बेसॉल्ट खडकापासून तयार करण्यात आलेल्या या पुलाचं पाडकामही सुरू करण्यात आलं. मात्र त्यातच आता एक अनपेक्षित वृत्त समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार संपूर्ण प्रक्रियेदरम्यानच आता ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम रखडणार आहे.
परळला प्रभादेवी परिसराशी जोडणाऱ्या या पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील भाग हटवण्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याअनुषंगाने 'महारेल'नं पश्चिम रेल्वेला पत्रही लिहिलं. मात्र तब्बल 59 कोटींचं शुल्क दिल्याशिवाय पाडकामाला परवानगी देण्यास पश्चिम रेल्वेनं नकार दिला आहे. तर तिथून अवाजवी शुल्क देण्यास 'महारेल'नंही नकार दिला आहे. या दोन्ही यंत्रणांमधील या मतभेदाचा आता नागरिक, वाहनधारकांना थेट फटका बसणार आहे.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वरळी-शिवडी उन्नत मार्ग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतून जातोय. एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम आणि त्या ठिकाणी नव्या डबलडेकर पुलाचं बांधकाम करण्यासाठी दोन्ही रेल्वे प्रशासनांची परवानगी महत्त्वाची आहे. थोडक्यात या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असणं महत्त्वाचं आहे. याचसाठीच्या प्रक्रियेअंतर्गत 'महारेल'नं पत्रव्यवहार केला खरा. मात्र त्यावर 'वे लिव्ह चार्जेस' म्हणून मध्य रेल्वेने 10 कोटी रुपयांची मागणी केली, तर पश्चिम रेल्वेने तब्बल 59.14 कोटी रुपयांची मागणी केली.
दरम्यान उपलब्ध माहितीनुसार 'महारेल'नं सुरुवातीला पश्चिम रेल्वेला 9 कोटी रुपये दिले होते. ते पैसे पश्चिम रेल्वे परत पाठवले आणि 'गतिशक्ती' या राष्ट्रीय मास्टर प्लानच्या नियमांतर्गत कार्गो टर्मिनलसाठी लागू होणारे जास्तीचे शुल्क मागितलं जात असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. थोडक्यात पुलाचं पाडकाम यंत्रणांच्या समन्वयाअभावी रखडण्याची शक्यता असून, आता मुंबईतील आणखी एक प्रकल्पाचा वेग मंदावला, हीच वस्तूस्थिती समोर येत आहे.
एल्फिन्स्टन पुल काय आहे आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय?
मुंबईतील परळ आणि प्रभादेवी परिसर जोडणारा हा ऐतिहासिक पुल आहे. ब्रिटिश काळात बांधलेला असून, उत्तम दर्जाच्या बेसॉल्ट खडकापासून तयार केला गेला.
पुलाचे पाडकाम कधी सुरू झाले आणि सध्या स्थिती काय?
पाडकाम प्रक्रिया सुरू झाली असली तरी ती रखडली आहे. रेल्वे मार्गावरील भाग हटवण्यासाठी रेल्वेचा ब्लॉक आवश्यक असल्याने पश्चिम रेल्वेची परवानगी मिळाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत महारेलने अद्याप सुधारित पाडकाम योजना पश्चिम रेल्वेकडे सादर केलेली नाही.
महारेलने काय केले आणि रेल्वेची प्रतिक्रिया काय?
महारेलने पश्चिम रेल्वेला पत्र लिहून परवानगी मागितली. सुरुवातीला 9 कोटी रुपये दिले गेले, पण पश्चिम रेल्वेने ते परत पाठवले आणि 'गतिशक्ती' राष्ट्रीय मास्टर प्लॅननुसार कार्गो टर्मिनलसाठी लागू होणारे जास्त शुल्क मागितले.