Mumbai Crime News : संपूर्ण राज्याला सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळं गंभीर वळण मिळालेलं असतानाच आता मुंबईतून अतिशय खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. मुंबई शहरातील अतिशय गजबजलेल्या अशा चुनाभट्टी भागात वास्तव्यास असणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानं खासगी जीवनातील वादळामुळं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
चुनाभट्टी इथं एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानं पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि तिच्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली. सदर घटनेदरम्यान मयत तरुणानं मोबाईलमध्ये आपण पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून आत्महात्या करत असल्याचं म्हणत एक व्हिडीओ रेकॉर्ड केला.
या घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी मयत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगा सिद्धेश आणि मानसी यांचा विवाह 2020 मध्ये झाला होता. मानसी आणि सिद्धेशचा प्रेमविवाह झाला असतानाही ती मित्रांसोबत चॅटिंग करत असल्याने लग्नानंतर काही दिवसांतच या दोघांमध्ये खटके उडू लागले आणि याच कारणामुळं वाद पराकोटीस गेला आणि सिद्धेशनं 18 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा, सून आणि मुलीसोबत चुनाभट्टीतील निवासस्थानी राहत होता. त्यांच्या मुलानं 18 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. ज्यानंतर यवतमाळ इथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करम्यात आले. यानंर जेव्हा हे कुटुंब चुनाभट्टीतील घरी पोहोचलं आणि सिद्धेशच्या आत्महत्येशी संबंधित शेवटचा पुरावा समोर येताच एकच खळबळ माजली.
आत्महत्येचं पाऊल उचलण्यापूर्वी सिद्धेशनं लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीमध्ये पत्नीकडून आपला मानसिक छळ आणि सततचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं त्यानं त्यात लिहिलं होतं. शिवाय त्याच्या मोबाइलमध्ये आत्महत्येपूर्वी त्यानंच बनवलेला एक व्हिडीओसुद्धा आढळला, ज्यामध्ये सिद्धेशनं वडिलांना उद्देशून काही गोष्टी स्पष्ट केल्याचं उघडकीस आलं.
'पप्पा, माझी पत्नी मानसी रत्ने आणि तिचा मित्र युवराज जाधव आणि यांना सोडू नका. माझ्या मुलीचा ताबा फक्त माझ्या आई-वडिलांकडे द्या, आई आणि तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या...', अशी आर्जव करत पत्नी आणि तिच्या प्रियकराने मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा सिद्धेशनं केल्यानं आता चुनाभट्टी पोलिसांनी याप्रकरणीचा पुढील तपास हाती घेतला आहे.