BMC Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढील काही महिन्यांमध्ये जाहीर होणार असून, त्या धर्तीवर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीसुद्धा कंबर कसली आहे. पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच काही पक्षांमध्ये नव्या प्रवेशांनी राजकीय समीकरणांमध्येही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे गट मागे राहिला नसून या पक्षानं आगामी निवडणुकीसाठीची रणनितीसुद्धा आखल्याचं स्पष्ट होत आहे.
'लढा आपल्या मुंबईचा' या मोहिमेच्या माध्यमातून ठाकरे गट मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. मुलुंड इथं ठाकरे गटाचा मेळावा पार पडल्यानंतर 1 ऑगस्टला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत या महामोर्चाचं आयोजन केलं जाईल.
'लढा आपल्या मुंबईचा' माध्यमातून ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत 10 जून ते 1 ऑगस्टपर्यत मुंबईतील विविध भागात आंदोलनं पार पडतील.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया' या मोहिमेला मंगळवार (10 जून) पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, शहरात नेमकं कधी आंदोलन पार पडेल आणि त्या आंदोलनाचं स्वरुप काय असेल याचीसुद्धा संक्षिप्त माहिती ठाकरेंच्या शिवसेनेनं जारी केली असून, थेट तारखांसहच सत्ताधाऱ्यांना ललकारलं आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही.
10 जून ते 13 जूनदरम्यान 'लढा आपल्या मुंबईचा' अंतर्गत अदानींविरोधात वार्ड अधिकारी यांना निवेदन देणं.
14 जून- मुंबईच्या लढ्याविषयी मुंबईतील प्रत्येक घराघरात परिपत्रक वाटप
22 जून - शाखानिहाय मुख्य चौकात फलकबाजी आणि बैठका
29 जून - शाखानिहाय राष्ट्रपती यांना अदानी यांच्या विरोधात पोस्ट कार्ड पाठवणं
6 जुलै - आषाढी एकादशी निमित्त महिला दिंडीचे आयोजन करून अदानींना विरोध करणं
13 जुलै - खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरीक यांच्या बैठका
20 जुलै - 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतीत नागरिकांना माहिती देणे आणि पत्रक वाटप
28 जुलै - महाआरतीचं आयोजन
29 जुलै - शाखानिहाय मुख्य चौकात अदानींविरोधात फलकबाजी आणि बैठक
1 ऑगस्ट - आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा