मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार, 'हा' महत्त्वाचा पूल कधी खुला होणार?

Carnac Bridge Update: कर्नाक पूल कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाक पुलाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीय 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2025, 01:48 PM IST
मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार, 'हा' महत्त्वाचा पूल कधी खुला होणार?
Mumbai News Today Carnac Bridge is almost ready and is likely to open by next week

Carnac Bridge Update: मशीब बंदर रेल्वे स्थानकापासून ते पी.डि मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत कधी दाखल होणार? याची अद्यापही प्रतीक्षाच आहे. 10 जूनपर्यंत हा पूल खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर पालिकेचे होते. मात्र जून महिना संपायला 8 दिवस बाकी असतानाही पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाहीये. 

कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेचे होते. विक्रोळी पूल मात्र पावसाळ्यापूर्वी सुरू झाला. मात्र कर्नाक पुलाला अद्यापही मुहूर्त सापडला नाही. पुलाचे बांधकाम 10 जून रोजीच पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने लेन मार्किंग, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या आठवडयात पावसामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे एक दिवस जरी उघडीप मिळाली तर ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. 

दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. 125 वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये पूल पाडून टाकला. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. तसेच रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पुलाची पाहणी केली असून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पूल येत्या आठवड्याभरात सुरू होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, 154 वर्ष जुना असलेल्या पुलाची आठवण राहण्यासाठी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना सहज दृश्यमानता मिळावी म्हणून मुळ पुलाच्या बांधकामातील जुने चार बेसाल्ट दगड पुलाच्या मध्यभागी लावले जाणार आहेत. तसंच, दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पुलावर प्रत्येकी चार लेन असणार आहेत. या दगडांवर 1858 आणि 1868 ही वर्षे कोरण्यात आली आहेत. या कालावधीत पुलाचे बांधकाम सुरू होऊन पूर्ण झाले. त्यावर मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत पुलाचे नाव लिहिले आहे. या चारही दगडांपैकी प्रत्येकी दगड हा 2 फूट रुंद आणि तीन फुट उंच आहे.