मुंबई : शहरातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे, याचे पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्याने सर्वांसमोर ठेवले आहे. ११ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने बिल्डरने तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेली लाचेची रक्कम मीडियासमोर ठेवली आणि कारवाईची मागणी केल्याचा आरोप केलेत. ११ कोटी लाच देण्याचे मान्य केल्यानंतर १ कोटीचा पहिला हफ्ता त्यांना मिळाला. तो बिल्डरकडून दिला जात असताना त्यांनी स्टिंग ऑपरेशनही केल्याचा आरोप केलाय.
विक्रोळी पार्कसाइट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरने सर्वांना कसे मॅनेज केले याचे पुरावेसुद्धा समोर ठेवले. येवले यांनी SRAचे नुकतेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लाच रूपाने मिळालेली रक्कम येवले मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत.
गेली २२ वर्षे विक्रोळीच्या SRA आणि इतर योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढताना येवले यांनी आपलं घर विकलं. तसंच त्यांच्यावर ४ वेळा हल्लेही झालेत. या प्रकरणात दाद मागताना खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.