Mumbai South Central Lok Sabha Election Result: दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्याविरुद्ध राहुल शेवाळे निवडणुकांच्या रिंगणात होते. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांना पराभूत केले आहे. दक्षिण मध्य मुंबई ही जागा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे. अणुशक्तीनगर,चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात आधीपासूनच ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. अनिल देसाई यांच्या विजयामुळं ठाकरे गटाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे व ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होती. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला होता. राहुल शेवाळे गेले दोन टर्म या मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना लोकसभेचे तिकिट दिले होते. मात्, या मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व असल्यामुळं राहुल शेवाळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभं राहिलं होतं. अनिल देसाई यांचा जनसंपर्क तगडा असल्याने त्यांनी राहुल शेवाळे यांना पराभूत करत विजय मिळवला आहे. 


कोण आहेत अनिल देसाई


अनिल देसाई हे पक्षातील मुत्सदी राजकारणी आणि पक्षाचे सचिव आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही अनिल देसाई यांचे नाव घेतले जाते. त्यांनी महाविद्यालयीन काळापासूनच शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. 1997 मध्ये ते पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले.  2002 मध्ये थेट शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये सचिव पदावर त्यांची वर्णी लागली होती. तेव्हापासून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या पक्षाने सोपवल्या आहेत. पक्षाच्या पडद्या मागील घडामोडीमध्ये अनिल देसाई नेहमीच सक्रीय राहिले आहेत. अनिल देसाई गेले दोन टर्म राज्यसभेचे सदस्य होते. मात्र, जनतेतून निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. 


अनिल देसाई यांना शिवसेनेत भाऊ या नावाने ओळखले जाते. अनिल देसाई हे 2024च्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच जनतेतून निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले. अनिल देसाई हे नेहमी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर असल्याने मतदारसंघात तसा त्यांचा प्रभाव व जनसंपर्क कमी होता. मात्र, त्यांच्या उठा महाराष्ट्र या संकल्पनेने ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते.