Mumbai University Course: मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत तुम्हाला दुहेरी पदवी, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, परदेशी भाषांसह अनुसंधान नेशनल रिसर्च फाऊंडेशनच्या स्पोक प्रारूपाअंतर्गत संयुक्त संशोधन, विकास आणि प्रशिक्षणाच्या विविध संधीचे दालन खुले झाले आहे. मुंबई विद्यापीठ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रविष्ठ होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेऊ शकणार आहेत. या अनुषंगाने आज मुंबई विद्यापीठ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए. बीकॉम, बीकॉम ( अकाऊंटिंग अँड फायनान्स ), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत.पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, शिक्षणशास्त्र) एमकॉम ( एडव्हान्स अकाऊंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमस्सी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र, एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची निवड करू शकणार आहेत. मल्टीडिसिप्लनरी मायनर अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या फ्रेंच, जर्मनसह विविध भाषा विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमासही अभियांत्रिकीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत.
दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ या दोन्ही उच्च शैक्षणिक संस्थात झालेल्या कराराच्या अनुषंगाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठ सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे. मुंबई विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड अप्लायड सायनेन्स स्थापन होणाऱ्या रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्रातील संयुक्त प्रकल्प आणि संशोधन उपक्रमासाठीही दोन्ही विद्यापीठ सोबत काम करतील. तसेच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या आयआयटी मुंबई या हब मधील स्पोक म्हणून काम करणाऱ्या मुंबई विद्यापीठ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे संयुक्त संशोधन प्रकल्पावर काम करणार आहेत.
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्यासाठी आणि त्याच वेळी भाषिक ज्ञान आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी संधी मिळावी यावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमता, गुणवत्ता आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी त्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला, भाषा, तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक विषयांसारख्या विविध विषयांमधील शिक्षणाची उपलब्धता करून देण्यासाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
'गेल्या काही वर्षांपासून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सेवेत जाण्याचा कल वाढीस लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वेळी सामाजिक शास्त्रे, कला आणि भाषा विषयीचे शिक्षण सोबतच उपलब्ध झाल्यास त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकेल. त्या अनुषंगाने या कराराचे फार महत्व असल्याची प्रतिक्रिया सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक सुनिल भिरूड यांनी दिली.