Good News: मुंबई विद्यापीठातून घेता येणार ड्युअल, जॉइंट आणि ट्विनिंग डीग्री
Mumbai University: मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे.
Mumbai University: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या धर्तीवर आणि आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधीचे दालन खुले करण्यासाठी मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील आणि ज्ञानक्षेत्रातील ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध होतील.
दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत आता विद्यार्थ्यांला दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थामध्ये एकत्र प्रवेश घेता येणार असून त्यास शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळणार आहेत. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स/ऑनलाइन मोडमध्ये किंवा एका प्रत्यक्ष आणि एका डिस्टन्स मोडमध्ये दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही डिग्री आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील.
परंतु यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रितसर अनुमती घेऊन व शैक्षणिक सामंजस्य करार करणे गरजेचे राहणार आहे. तसेच दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत सहभागी संस्था/विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसची ओव्हरलॅपिंग होणार नाही याची याची खात्री करणे आवश्यक राहील, त्याचबरोबर प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर हे एकमेकांपासून 5-20 कि.मी.च्या अंतरावर असावे लागणार आहे.
तर सह पदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि सलंग्न महाविद्यालये इतर उच्च शिक्षण संस्था किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार करु शकतील. परंतू असे शैक्षणिक करार करताना त्या शैक्षणिक संस्था क्युएस टॉप १०००/एनआयआरएफ टॉप १००/ किवा नॅकची ‘ए’ श्रेणी असेल याची खात्री करावी लागेल. तसेच यासाठी विद्यापीठाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. मुंबई विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पाऊल टाकत सह पदवीच्या शिक्षणासाठी सेंट लुईस आणि मॉस्को स्टेट विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत तर ट्विनिंग डिग्रीसाठी फ्रान्स आणि इटली येथील विद्यापीठांशी करार केलेले असून अनेक आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी करारांची प्रक्रिया सुरु असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
या बहुविद्याशाखीय शिक्षणक्रमांना प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि अनुषंगिक बाबींची माहिती ही सुरुवातीलाच कळविली जावी असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षणामुळे दोन उच्च शिक्षण संस्थांमधील प्रगत ज्ञानशाखेचे सखोल अध्ययन व संशोधन तसेच ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे शिक्षण प्रणालींमध्ये मोठा बदल पाहावयास मिळणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींच्या सामायिकरणास यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल असेही कुलगुरू म्हणाले.
प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस मान्यता
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस विद्यापरिषदेनी मान्यता दिली आहे. समितीच्या शिफारशीनुसार हे पद भरताना उदयोन्मुख क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन तसेच विद्यापीठ विभागानी उद्योग जगतातील आवश्यक गरजा आणि क्षेत्र ओळखून हे पद भरण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच एआयसीटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अवलंबन आणि धोरणाचे वार्षिक पुनरावलोकन करण्यात यावे अशीही शिफारस समितीने केली आहे.