)
Redevelopment Project By MHADA: मुंबईतील नायगावच्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे या वादामध्ये स्थानिक भाजपा आमदाराने उडी घेतली असून लोकांना घरं खाली न करण्याचं आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या विषयामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनीही भाजपा आमदाराच्या आवाहनाला साथ दिल्याने भाजपा-ठाकरे सेनेचे अनोखी युती दिसून आली आहे.
वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पात एका फ्लॅटमागे पार्किंग दिले जात असेल तर हाच नियम नायगावच्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पालाही लागू करा, अन्यथा घरे रिकामी करू नका, असे आवाहन भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बीडीडीवासीयांना केले. यामुळे नायगाव बीडीडी पुनर्वसन प्रकल्प रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नायगावच्या चाळ क्रमांक 1 आणि 19 मधील भवानी माता मंदिर प्रांगणात सोमवारी बीडीडी चाळ रहिवासी, स्थानिक आमदार, खासदार आणि म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कोळंबकर यांनी राहिवाशांची एका फ्लॅटमागे एक पार्किंग जागा, भाडेवाढ आणि अन्य मागण्या म्हाडाकडे लावून धरल्या. त्याला खासदार देसाई यांनी पाठिंबा दर्शविला.
2021 मध्ये रहिवाशांना 25 हजार रुपये प्रतिमाह भाडे जाहीर केले, पण महागाई निर्देशांक वाढत असताना रहिवाशांना 35 हजार रुपये भाडे द्या किंवा रहिवाशांना घरे उपलब्ध करून द्या, असे देसाई यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी माहीमचे आमदार महेश सावंतदेखील उपस्थित होते.
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) द्वारे राबवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबईतील जुने बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) चाळींच्या पुनर्विकासासाठी आहे, ज्यात नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथील चाळींचा समावेश आहे. या प्रकल्पाचा उद्देश शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्ण झालेल्या चाळींना आधुनिक, सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासस्थानांमध्ये रूपांतरित करणे असा आहे. यामुळे सुमारे 15 हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. ही आकडेवारी पाहता हा मुंबईतल सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.
बीडीडी चाळी ब्रिटिश काळात (1920 च्या दशकात) बांधल्या गेल्या होत्या, ज्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन 22 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.नायगाव येथील प्रकल्पात अनेक चाळींचा समावेश आहे, ज्यात प्लॉट 'ए' येथील 14 चाळींचे पुनर्विकास कार्य सुरू आहे. येथे रहिवाशांसाठी बैठकांद्वारे माहिती दिली जाते आणि नोंदणीकृत करारनाम्यांसाठी वेळापत्रक जाहीर केले जाते.
नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पाच पुनर्वसित इमारतींमधील 864 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतींसाठी अग्निशमन दलाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र (NOC) मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण प्रकल्पात विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची विक्रीही होणार आहे, ज्यामुळे MHADA ला अतिरिक्त निधी मिळेल. नायगावसह इतर ठिकाणी सोडती (लॉटरी) प्रक्रिया राबवली जाते, ज्यात 17 मे 2022 आणि 2 ऑगस्ट 2022 रोजी निकाल जाहीर झाले.