मुंबई : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच दुपारी नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक सुरु आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. याशिवाय बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोलेही वर्षावर दाखल झाले आहेत. 


राणेंची अटक, कायदेशीरबाबी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राणेंच्या अटकेमुळे कोकणात त्याचे सर्वाधिक पडसाद उमटू शकण्याची शक्यता असल्याने कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.