'किल्ल्या' तसा माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा...'; 'त्या' राजकीय फोटोमागची खरी गोष्ट

सोशल मीडियावर गुरुवारपासून एक फोटो व्हायरल होत होता. या फोटोमागची खरी गोष्ट समोर आली आहे. स्वतः नरेश म्हस्के यांनी याबाबत खुलासा केला आङे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 23, 2026, 07:47 PM IST
'किल्ल्या' तसा माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा...'; 'त्या' राजकीय फोटोमागची खरी गोष्ट

मुंबईच्या राजकारणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहे. दररोज वेगवेगळ्या हालचाली समोर येत आहे. असं असताना गुरुवारी एक फोटो समोर आला जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्याची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरु आहे. एकेकाळचे परस्परांचे कट्टर विरोधक असलेले मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची अचानक भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

Add Zee News as a Preferred Source

शिंदे अन् राज ठाकरेंच्या शिलेदारांची भेट

कोकण भवनातील एका अनपेक्षित भेटीने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मनसेच्या नगरसेवकांनी गट नोंदणीसाठी उपस्थिती लावली असतानाच, शिंदे गटाचे खंबीर नेते आणि खासदार नरेश म्हस्के व मनसेचे यशवंत किल्लेदार यांची समोरासमोर भेट झाली. एकेकाळचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आज ज्या पद्धतीने खेळीमेळीत भेटले, त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ही भेट केवळ योगायोग होती की भविष्यातील नव्या युतीचे संकेत? यावर आता मंथन सुरू झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीक गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अशातच या दोन्ही नेत्यांमधील संवाद आगामी राजकीय बदलांची नांदी मानला जात आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात नव्या आघाड्यांची शक्यता नाकारता येत नाही. असं असताना नरेश म्हस्के यांची पोस्ट समोर आली आहे. 

काय आहे नरेश म्हस्केंची पोस्ट?

'किल्ल्या' तसा माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र.
 भारतीय विद्यार्थी सेनेचं एकत्र काम करत असल्यापासून दोघांची घट्ट मैत्री.... महाविद्यालयीन जीवन संपलं, आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. दोघेही राजकीय क्षेत्रात असलो तरीही पक्ष वेगळे झाले.
पण काळाच्या कसोटीवर टिकून राहते तीच खरी मैत्री!!
इतक्या काळानंतरही वेगवेगळी स्थित्यंतरं अनुभवल्यानंतर सुद्धा आमची मैत्री अजूनही अबाधित आहे...
 हा आमचा 'किल्ल्या' म्हणजे श्री. यशवंत किल्लेदार जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आणि मनसेचे गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
आज कोकण आयुक्तांकडे गेलो असता 'किल्ल्या'ची भेट झाली आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माझ्या ह्या मित्राला पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.!! 

 मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी रणधुमाळीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिंदे सेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट त्याच रणनीतीचा एक भाग असावा, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More