फक्त विमानतळ नाही तर 56920 कोटींचे प्रकल्प अन् 'ते' खास App आजपासून मुंबईच्या सेवेत; वाचा सविस्तर

PM Modi In Maharashtra Projects He Will Inaugurate: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते कोणकोणत्या प्रोजेक्टसचं उद्घाटन करणार आहेत पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 8, 2025, 06:35 AM IST
फक्त विमानतळ नाही तर 56920 कोटींचे प्रकल्प अन् 'ते' खास App आजपासून मुंबईच्या सेवेत; वाचा सविस्तर
मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (प्रातिनिधिक फोटो)

PM Modi In Maharashtra Projects He Will Inaugurate: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज पंतप्रधान मोदी करणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

30 हजार नागरिकांची हजेरी

नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सुमारे 30 हजार नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने आसन आणि मंडप व्यवस्था तयार केली आहे. या कार्यक्रमाला 600 बसमधून भाजप कार्यकर्ते येणार आहेत. वी मुंबई विमानतळाचे लोकार्पण व उद्घाटनानंतर पंतप्रधान मुख्य समारंभस्थळी जाहीर सभेत नागरिकांना मार्गदर्शन करतील.

कोण कोण राहणार उपस्थित?

नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणातील कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र आज पंतप्रधान मोदी केवळ विमानतळाचं उद्घाटन करणार असून इतरही अनेक गोष्टींचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हे प्रकल्प आणि योजना कोणत्या ते जाणून घेऊयात...

अल्पमुदतीचे 'एसटीईपी' कार्यक्रम

'अल्प कालावधीचे रोजगारक्षम कार्यक्रम' या अभिनव कौशल्य उपक्रमाचा प्रारंभ पंतप्रधान करणार आहेत. राज्यातील 419 शासकीय, तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 141 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2506 नवीन बॅचेस सुरू होणार आहेत. या माध्यमातून 75 हजार प्रशिक्षणार्थींना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात महिलांसाठी 364 विशेष बॅचेस असतील.

विशेष अॅपवर

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'मुंबई वन' या भारतातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे अनावरण होणार आहे. त्यातून मेट्रो, लोकल, बससह 11 सेवांचे तिकीट एकाच अॅपवर मिळणार आहे. कॅशलेस व डिजिटल वॉलेट्सवरून तिकीट काढता येईल.

कोणत्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण

सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मोदींच्या हस्ते होईल. पंतप्रधान मोदी हे उद्घाटन केल्यानंतर विमानतळावरील सोयी-सुविधांची पाहणी करतील. या विमानतळावरून डिसेंबर 2025 मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या 33.5 कि.मी. लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौक-कफ परेड मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. प्रवाशांना दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा असणार आहे. मुंबई मेट्रो मार्गिका -3 हा एकूण 37,270 कोटी रुपयांहून अधिक खर्चातून बांधण्यात आला आहे.

ब्रिटीश पंतप्रधानांना भेटणार

भारत-ब्रिटन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मुंबईत ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर भारत-ब्रिटन धोरणात्मक भागीदारीचा आणि व्हिजन 2035 पथदर्शी आराखड्याचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर यांची ग्लोबल फिनटेक महोत्सव 2025 मध्‍ये भाषणे होणार आहेत. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More