मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 22 ते 31 जुलै हा सप्ताह 'अजित उत्सव' (Ajit Utsav) या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याचे वाढदिवसाचं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, वॉटरफिल्टर, छत्री वाटप,शाळकरी मुलींना सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, अजितदादा जसे सकाळी सहा वाजता उठतात तसंच ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे.


महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, त्यामध्ये लघु, मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग भारत सरकार आणि राज्यसरकार यांच्या माध्यमातून 35 टक्के अनुदानातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी, महिला कोणता व्यवसाय घेऊ शकतात याचे मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकातून त्यांना कर्ज कसे उपलब्ध होईल, त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल असा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. याशिवाय महिला आरोग्य विषयक शिबीरेही घेतली जातील. या शिबिरात गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्या रुग्णाला उपचार कसे मिळतील याचे नियोजनही करण्यात आले आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितलं.


बेरोजगारी आणि युवक हा प्रश्न संबंध राज्यात आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'रोजगार नोकरी महोत्सव' मेळावा राज्यात आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यसरकार जी रिक्त पदांची भरती करणार आहे त्याची माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमात अंतर्भूत केला आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितलं. 


तसंच इनडोअर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यातील युवतींसाठी शाळा व महाविद्यालयात 'स्वसंरक्षण शिबीरे' आयोजित केली जाणार आहेत.