राष्ट्रवादीला मोठा झटका; ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपच्या वाटेवर?

लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईत राष्ट्रवादीची कामगिरी निराशाजनक होती.

Updated: Jul 29, 2019, 11:34 AM IST
राष्ट्रवादीला मोठा झटका; ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपच्या वाटेवर? title=

नवी मुंबई: सचिन अहिर, चित्रा वाघ आणि वैभव पिचड या बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राष्ट्रवादीला आणखी मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील पालिका स्तरावरील राजकारणावर पकड असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईकही आता भाजपमध्ये सामील होणार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ नगरसेवक पक्षाला रामराम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीत भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपला जवळ केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची आणखी पडझड होण्याचे अंदाज वर्तवले जात होते. 

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक भाजपवासी होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून नाईक यांच्यावर दबावही आणला जात होता. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईत राष्ट्रवादीची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी अनेक नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे आता गणेश नाईक याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकल्या असल्या तरी, नाईक यांची गेल्या २० वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे. त्यामुळे नाईक भाजपमध्ये गेल्यास विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.