कोविड - १९ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत सोळाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. या फेरीतील चाचण्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. सर्व १०० टक्के नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात ओमायक्रॉनचे उपप्रकार एक्सबीबी (XBB) ने १५ टक्के तर एक्सबीबी.१ (XBB.1) ने १४ टक्के रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. या चाचण्यांचे विविध परिमाणांच्या आधारे करण्यात आलेले मुद्देनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे


२३४ रुग्णांचे कोविड विषाणू उपप्रकारानुसार विश्लेषण


  • • २३४ नमुन्यांपैकी सर्व १०० टक्के अर्थात २३४ नमुने हे ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे आहेत.

  • • यातील १५ टक्के अर्थात ३६ नमुने हे एक्सबीबी (XBB) या उपप्रकाराचे आहेत.

  • • तर १४ टक्के म्हणजेच ३३ नमुने हे एक्सबीबी.१ (XBB.1) या उपप्रकाराचे आहेत.


रुग्णांचे वयोगटानुसार विश्लेषण -


२३४ रुग्णांपैकी–
• ० ते २० वर्षे – २४ (१० टक्के)
• २१ ते ४० वर्षे - ९४ (४० टक्के)
• ४१ ते ६० वर्षे - ६९ (२९ टक्के)
• ६१ ते ८० वर्षे - ३६ (१५ टक्के)
• ८१ ते १०० वर्षे – ११ (५ टक्के)

चाचण्या करण्यात आलेल्या २३४ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १६ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ७ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ६ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. तथापि, या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.


२३४ चाचण्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण


एकूण २३४ बाधितांपैकी, ८७ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी, १५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील कोणालाही अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही.

उर्वरित, १४७ जणांनी लस घेतलेली होती. त्यापैकी ७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ओमायक्रॉन बाधित एका रुग्णास अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर २ वयोवृद्ध रुग्णांचा इतर सहव्याधींमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक जण ८८ वर्षांचे पुरुष रुग्ण होते. त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसांचा विकार होता. या सहव्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ७४ वर्ष वयाच्या महिला रुग्णास मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी विकार होते.

दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने लसीकरण पूर्ण करुन घेणे, गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी अर्थात ‘मास्क’चा स्वेच्छेने वापर, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

सर्व मुंबईकर नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवश्यक तेथे योग्य पालन करावे, असे विनम्र आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.