'नाईटलाईफ गँगने सुशांतचा बळी घेतला', आशिष शेलारांचा आरोप

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता ड्रग्जचा ऍन्गल समोर आला आहे. 

Updated: Aug 27, 2020, 04:45 PM IST
'नाईटलाईफ गँगने सुशांतचा बळी घेतला', आशिष शेलारांचा आरोप title=

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता ड्रग्जचा ऍन्गल समोर आला आहे. रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख आला आहे. या मुद्द्यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी आरोप केले आहेत. ड्रग पब ऍण्ड पार्टी संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या नाईटलाईफ गँगने सुशांतचा बळी घेतल्याचं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. 

या "ड्रग-पब-पार्टी" टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल!, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पैशांच्या देवाणघेवाणीचा मुद्दा आल्यामुळे ईडी सुरुवातीपासूनच तपास करत होती. यानंतर सुशांतचे वडिल आणि बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा सीबीआयने तपास करावा, असा निकाल दिला. यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आलं. 

सीबीआय आणि ईडीच्या तपासामध्ये ड्रग्जचा उल्लेख आल्यामुळे या प्रकरणात एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचीही एन्ट्री झाली. एनसीबीने कालच याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीच्या काही व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जबाबत बोललं गेल्याचं तपास यंत्रणांना आढळून आलं आहे.