विधानसभेत मोठा गोंधळ, भाजप आमदारांची तालिका अध्यक्षांच्या आसनासमोर धाव
OBC इम्पेरिकल डेटासंबंधी प्रस्ताव संमत झाल्यावर भाजप (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले.
मुंबई : OBC इम्पेरिकल डेटासंबंधी प्रस्ताव संमत झाल्यावर भाजप (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली होती. त्यानंतर तालिका अध्यक्षांच्या दालनातही जोरदार वाद झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजप आमदार जोरदार संतापले होते. ठराव घाईघाईत मंजूर केल्यामुळे भाजप आमदार संतापले. अध्यक्ष महोदयांवर धावून जाणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. तर तालिका अध्यक्षांच्या सभागृहात धक्काबुक्की झाली नाही, सरकारचा बुरखा तुमच्यासमोर फाडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा एम्पिरिकल डेटा केंद्राकडे मागणारा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला. या प्रस्तावामुळे कोणताही फायदा होणार नाही, हा प्रस्ताव राजकीय आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. सरकारने दिशाभूल करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय. तर सरकारचा ठराव मायावी आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. तर समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. 2019पर्यंत फडणवीसांनी काहीच केलं नाही, असा आरोप भुजबळांनी केला.
31 जुलै 2021 पर्यंत MPSCच्या रिक्त जागा भरणार आहे, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलीय. स्वप्नील लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येनंतर आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला. स्वप्नील लोणकर यांच्या कुटुबीयांना ५० लाखांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली. सरकार याची गांभीर्याने दखल घेणार आहे का?असा सवाल फडणवीसांनी विचारला. विरोधकांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.