)
Paint Thrown On Statue Of Meenatai Thackeray: दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याप्रकरणी पोलिसांनी काही तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा ठाकरेंच्या पक्षातील एका कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याच्या मुद्द्यावरुन बुधवारी राज्यातील राजकारण चांगलेच तापले. उद्धव ठाकरेंसहीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरेंनीही माँसाहेबांच्या पुतळ्याची पहाणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकाराचा निषेध केला. दरम्यान आता आरोपी सापडल्यानंतर भाजपाने या प्रकरणावरुन ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अज्ञाताने लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला. यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटना समोर आल्यानतंर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दुपारी ही घटना घडल्यानंतर पोलीस अनेक तास सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते. आम्ही स्वत:हून दखल घेत तक्रार दाखल करु असं म्हणत पोलिसांनी तपास सुरु ठेवला. अखेर रात्री आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
फरक दोन संस्कृतीतील! या मथळ्याखाली महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. "काल कोण्या समाज कंटकाने, माथेफिरूने माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला गेला. भाजपाच्या सर्व नेत्यांनी संताप व्यक्त करीत गुन्हेगाराला तत्काळ पकडून कारवाई व्हायला हवी, ही एकमुखाने मागणी केली. उबाठाच्या उध्दव ठाकरे व सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्याच भावना भाजपाच्या होत्या, कारण आई ही आईच असते. तिथे दुजाभाव नसतो," असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
पुढे याच पोस्टमध्ये, "मात्र बरोबर 14 दिवसांपूर्वी 4 सप्टेंबर रोजी दैनिक 'सामना'त अग्रलेख आला होता. मोदींजींच्या आई बाबत… “पंतप्रधान मोदी यांच्या रडगाण्याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. 'व्होट अधिकार' यात्रेत भाजपने स्वतःचेच लोक घुसवून 'आयाबहिणी'चा उद्धार करवून घेतला असावा. हीच शक्यता सगळ्यात जास्त आहे.” बिहार निवडणुक प्रचारात राहुल गांधीच्या सभेत मोदीजीच्या आईबदद्ल असभ्य भाषेत बोलले गेले. त्या बद्दल ही भाषा आहे उध्दव ठाकरे संपादक असलेल्या दैनिक 'सामना'ची!" असंही उपाध्ये यांनी म्हटलंय.

पोलिसांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र गुणाजी पावसकर याला बुधवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. उपेंद्र पावसकरने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. उपेंद्र पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याच्या जबाबात संपत्ती वादात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप समोर आला आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर व आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रारींसाठी सतत धाव घेणाऱ्या व्यक्तीशी आरोपीचा संबंध असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपाकडून काय टोला लगावला गेला?
महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून 'फरक दोन संस्कृतीतील' असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्या संपादित 'सामना'च्या 4 सप्टेंबरच्या अग्रलेखावर टीका केली. त्यात मोदींच्या आईबद्दल असभ्य भाषेचा उल्लेख करत, "आई ही आईच असते" असं म्हणत द्विरंगी भूमिकेचा आरोप केला.
पोलिसांची कारवाई काय आहे?
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला, जरी पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अडचणी आल्या. स्वतःहून तक्रार दाखल करून आरोपीला पकडलं गेलं. तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने काय कबुली दिली?
उपेंद्र पावसकरने पोलिसांना दिलेल्या जबाबात संपत्ती वादातील रागामुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली. त्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा या वादात हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. तसेच, तो दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रारींसाठी सतत धाव घेणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली.