स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना गुरुवारी अटक केली. 


अभय कुरूंदकरांना ७ दिवसांची कोठडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्यांना पनवेल कोर्टात हजर केले असता अश्विनी बिद्रेंच्या अपहरणात अभय कुरूंदकर यांचा हात असल्याचा दावा पनवेल कोर्टात पोलीसांकडून करण्यात आला. कोर्टाने कुरुंदकरांना ७ दिवसाची पोलीस कस्टडी दिलीय. 


अश्विनी बिंद्रेचा अद्याप शोध नाहीच


कळंबोली परिसरातून गेल्या पावणे दोन वर्षापासून बेपत्ता असलेली कोल्हापूरची पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे हिचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तिचा प्रियकर पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केलीय.  अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेम संबंध होते. कळंबोली पोलिस ठाण्यात हजर होण्यापुर्वी २०१५ - १६ या वर्षात रत्नागिरीतील एका फ्लॅटमध्ये हे दोघे रहात होते. त्या फ्लॅटमध्ये कुरुंदकर अश्विनीला वारंवार मारहाण करत असल्याचं CCTV मध्ये कैद झालंय. याबाबत अश्विनीचा भाऊ आनंद बिंद्रे यानं केलेल्या तक्रारीनंतर कुरूंदकरला अटक करण्यात आलीय. त्यामुळं पोलीस वर्तुळात खळबळ माजलीय. पण अजूनही अश्विनी कुठे आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. 


कुरुंदकरांनी घराचा रंग बदलला


अश्विनी गायब झाल्यानंतर भाईंदर येथील राहत असलेल्या घराचा अभय कुरूंदकर यांनी घराचा रंग बदलला. पोलिसांनी घरातील रंग, भींतीचे नमुने घेतले आहेत. तसंच अश्वीनीचं मोबाईलचं अखेरचं लोकेशन अभय य़ांच्या भाईंदर इथल्या घराजवळच आहे. गायब होण्याआधी अश्विनी यांनी विपष्यनेसाठी जाणार असल्याचे आपल्याला सांगितल्याचे अभय यांनी पोलींसांच्या तपासात कबूल केले होते. मात्र राज्यात आणि परराज्यातील विपष्यना केंद्र तपासली असता अश्विनी यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने संपूर्ण संशयाची सुई अभय कुरूंदकर यांच्यावर आहे. कुरुंदकर यांना न्यायालयात सादर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.