पक्षप्रवेश `जोमात`, जनतेचे प्रश्न `कोमात`
जनतेच्या प्रश्नांवर नेत्यांचं मौन...
मुंबई : सध्या जो नेता पाहावा, तो प्रचारात, पक्षप्रवेशात किंवा कुठल्या पक्षात जाऊ याच विचारात आहे. या सगळ्यांमध्ये जनतेच्या प्रश्नांचा विचार तर सोडा बोलायलाही कुठल्या नेत्याला वेळ नाही. ज्या मतगारांच्या जीवावर हे नेते आमदार, नगरसेवक होणार आहेत. त्यांच्याकडेच लक्ष द्यायला या नेत्यांना वेळ नसल्याचं चित्र आहे. लोकांमध्ये यामुळे नाराजी आहे. संतप्त अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत.
एकीकडे सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आणि विरोधकांच्या यात्रा सुरु आहेत. एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे मतदारसंघावर पकड ठेवण्यासाठी पक्षप्रवेशही जोमात सुरु आहेत. आमदार, नामदारांसह राजेही पक्ष बदलत आहेत. चर्चा राजांची सुरू आहे प्रजा मात्र बिकट अवस्थेतून जाते आहे.
रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक निष्पाप लोकांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. पण सत्तेत बसलेले नेते यावर काहीही बोलायला तयार नाहीत.
पेट्रोल महागणार आहे, कांदाही रडवणार आहे., टॉमेटो मातीमोलाने विकला जातोय, बेरोजगारी, आर्थिक मंदीचा फटका बसतो आहे. पण नेत्यांचा याच्याशी काहीच देणं-घेणं दिसत नाही.
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं या प्रजेच्या मूळ समस्यांचा साधा उच्चारही सत्ताधारी, विरोधकांच्या मुद्द्यात फारसा नाही. त्यामुळे लोकशाहीच्या निवडणुकीच्या उत्सवात, मूळ मतदारराजाची मात्र उपेक्षाच होताना दिसते आहे.