)
Famous Actress Jumps Out Of A Moving Mumbai Local Train: 'रागिनी एमएमएस रिटर्न्स', 'प्यार का पंचनामा 2', 'उजडा चमन' आणि 'हम' या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेती करिश्मा शर्माचा एक विचित्र अपघात झाला आहे. बुधवारी हा अपघात झाला असून स्वत: करिश्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या अपघाताची माहिती आपल्या फॉलोअर्सला दिली आहे.
करिश्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने सांगितले आहे की, ती चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करत होती. ट्रेन सुरु झाल्यानंतर तिने काही कारणाने धावत्या ट्रेनमधून खाली उडी मारली. मात्र संतुलन गेल्याने ती पडली आणि जखमी झाली. अभिनेत्रीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
करिश्माने तिच्या नोटमध्ये, “काल, चर्चगेट येथे शूटिंगसाठी जात असताना, मी साडी घालून ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. मी चढताच ट्रेनने वेग पकडला आणि माझ्या मित्रांना ती पकडता आली नाही. भीतीमुळे मी उडी मारली - आणि दुर्दैवाने मी माझ्या पाठीवर पडले, माझ्या डोक्याला मार लागला आहे,” असं नमूद केलं आहे.
तिने पुढे "माझ्या पाठीला दुखापत झाली आहे. माझ्या डोक्याला मार लागला आहे. मला अनेक जागी जखमा झाल्यात. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे आणि डोक्याला झालेली दुखापत गंभीर नाही याची खात्री करण्यासाठी मला एक दिवस ऑब्झर्व्हेशनमध्ये ठेवले आहे. कालपासून मला वेदना होत आहेत, पण मी खंबीर आहे. कृपया मला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा. मला तुमच्या प्रेमाची गरज आहे," असंही चाहत्यांना म्हटलं आहे.

करिश्माच्या एका मैत्रिणीनेही तिचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. “हे घडलं यावर विश्वास बसत नाहीये... माझी मैत्रीण ट्रेनमधून पडली आणि तिला काहीच आठवत नाही. आम्हाला ती जमिनीवर पडलेल्या अवस्थेत सापडली आणि त्यानंतर आम्ही तिला इथे घेऊन आलो. डॉक्टर अजूनही तिच्या प्रकृतीसंदर्भातील अनेक गोष्टींचा शोध घेत आहेत - कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. लवकर बरी हो,” अशी कॅप्शन या मैत्रिणीने दिली आहे.

करिश्मासोबत घडलेल्या घटनेवरुन अनेकांना धडा घेता येईल. धावत्या ट्रेनमध्ये कोणीही चढण्याचा किंवा उडी मारण्याचा प्रयत्न करू नये, हेच या अपघातून अधोरेखित होत आहे.