Raj Thackeray : 'पैशांचा माज असेल तर...'; राज ठाकरेंचा थेट इशारा, कोणाला दिला गुजरातला जाण्याचा सल्ला?

Raj Thackeray News : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या मुलाखतपर पॉडकास्ट कार्यक्रमात यावेळी विशेष उपस्थिती होती राज ठाकरे यांची. या मुलाखतीत ते नेमकं काय म्हणाले? पाहा...   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2026, 01:37 PM IST
Raj Thackeray : 'पैशांचा माज असेल तर...'; राज ठाकरेंचा थेट इशारा, कोणाला दिला गुजरातला जाण्याचा सल्ला?
Raj Thackeray mns chief in To The Point With Kamlesh Sutar podcast mumbai kabutarkhana jain community bmc election 2026

Raj Thackeray News : महाराष्ट्र, मुंबई, मराठी या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरील आपल्या परखड भूमिका झी 24तासशी संवाद साधताना मांडल्या. संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असताना त्यांनी मुंबईत कबुतरांच्या मुद्द्यावरून माजलेल्या रणकंदनावरही भाष्य केलं. यावेळी भाजपवर सडकून टीका करत त्यांनी कराची भाषा करणाऱ्या आणि कबुतरखाने सुरू ठेवणाऱ्या भाषा करणाऱ्या जैन मुनींनाही खडसावलं. 

Add Zee News as a Preferred Source

कबुतरखान्यांवरुन राजकारण सुरु असून दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण केली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाजपवर केला. मुंबईचा महापौर मराठीच होणार यावर ठाकरेंनी जोर देत, 'यांच्याकडून कसलं राजकारण शिकावं? समाज बिघडवणारं आणि समाजात दुफळी माजवणारं?' असा खोचक सवालही केला.  

कबुतरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात...

'कबुतरांचा वाद मंगलप्रभात लोढांनी आणला, राजकारणासाठी करायला लावला. समाजासमाजात वाद करायचा, फूट पा़डायची आणि त्यावरून राजकारण करायचं?...' असा प्रश्नार्थक सूर आळवत जैन समाजाकडून कबुतरांच्या मुद्द्यावर आलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारला असता, 'मुंबईत गुजराती - मारवाडी 13 टक्के असून त्यांना पैशांचा माज असेल तर कबुतरं घ्या आणि जा गुजरातला..., उडवा तिथे कबुतरं. कबुतरांमुळं रोगराई पसरते इतकंही भान नाही तुम्हाला?' असा घणाघात त्यांनी केला.

हेसुद्धा वाचा : Raj Thackeray News : मराठी माणूस जागा आहे की झोपलाय? UP, बिहारमधील लोकांचं आश्चर्य वाटतं म्हणत राज ठाकरे गर्जले... 

दमा आणि असे अनेक विकार लोकांना होतात हे तुम्हाला कळत नाही असं नाही? मुळात कळतंय सगळं पण इथंही राजकारण करायचं असा सणसणीत टोला लगावत, 'अनेक लोकं पर्युषणनंतर येतात, पापांची क्षमा मागायला...' पण मुळात पापं करायचीच कशाला? असा बोचरा प्रश्न विचारत कबुतरांच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टच भूमिका मांडली. 

छटपुजेच्या मुद्द्यापासून ते महाराष्ट्रातील जमीनजुमला, मराठी माणसाचा हक्क अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी सातत्यानं आपल्या वक्तव्यांचा रोख हा मराठी माणसाकडे वळवत भाजपच्यचा एकंदर राजकीय भूमिकेवर ताशेरे ओढले, पालिका निवडणुकांच्या धर्तीवर सज्ज असणाऱ्या राज ठाकरे आणि त्यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या या युतीला आता मराठी मतदार नेमकी कशी साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More