मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज  मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोकणातील नाणार प्रकल्प, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या घटनांवर बोलण्याची शक्यता आहे. महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्याने राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता आहे.  दरम्यान, राज ठाकरे १ मेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची पहिली सभा पालघर येथे होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबईतील महिलांना शंभर ऑटोरिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मुलुंड येथील भाजी मार्केट परिसरात संध्याकाळी ६ वाजता ही सभा होईल. राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. राज ठाकरे यांच्याकडे अनेक जण आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन येत आहेत आणि चर्चा करत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचं राजकीय वजन चांगलेच वाढलेले आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणत्या विषयावर भाष्य करतात याची उत्सुकता आहे.


तसेच राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूकच्या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारवर टीका केलेय. त्यांनी व्यंग्यचित्रातून मोदी आणि अमित शाह यांच्यावर फटकारे ओढले आहेत. तसेच मार्च महिन्यात शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यातही त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. 'मोदीमुक्त भारत करा' अशी घोषणा केली. तसेच कोकणातील राजापूर नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने  राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. आपण योग्य वेळी समाचार घेऊ, असे राज यांनी उपस्थित शिष्टमंडळाला सांगितले. कोकणात भाजपकडून नाणार प्रकल्प लादला जात असल्याची चर्चा आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना हा प्रकल्प कशाला, याची चर्चा करण्यासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर गेले होते. त्यामुळे राज ठाकरे या प्रकल्पावर भाष्य करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.


दरम्यान, पेपर फुटल्याने राज ठाकरे यांनी दहावी आणि बारावी परीक्षेवर भाष्य केले होते. पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर पुन्हा देऊ नका, अशी रोखठोक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील मुलांसाठीचे पेपर पुन्हा घेतले नव्हते. त्यामुळे यावेळी राज ठाकरे कोणत्या प्रश्नांना हात घालतात, याचीच उत्सुकता आहे.