‘...तर आधी 60 कोटी रुपये भरा!’ हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापलं; अटकेचाही आवर्जून उल्लेख

Shilpa Shetty Raj Kundra Court Case: काही आठवड्यांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शिल्पा शेट्टीची चार तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2025, 08:56 AM IST
‘...तर आधी  60 कोटी रुपये भरा!’ हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापलं; अटकेचाही आवर्जून उल्लेख
उच्च न्यायालयाने फटकारलं (प्रातिनिधिक फोटो)

Shilpa Shetty Raj Kundra Court Case: मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (8 ऑक्टोबर रोजी) उद्योगपती राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडे थेट 60 कोटी रुपयांची मागणी केली. परदेशात जायचं असेल, तर आधी 60 कोटी रुपये जमा करा. मगच आम्ही तुमच्या परदेश दौर्‍याच्या याचिकेचा विचार करू, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

निमंत्रणासंदर्भात कोर्टाकडून विचारणा

शिल्पा हिच्याकडून आणखी एका परदेश दौर्‍यासाठी ज्या व्यावसायिक कार्यक्रमांची सबब पुढे केले जात आहे. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या संपर्काच्या लेखी पुराव्यांबाबत यावेळी न्यायालयाने विचारणा केली. तथापि, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच लेखी संपर्क साधला जाईल, असे शिल्पा हिच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने मात्र हे कारण स्वीकारण्यास नकार दिला. तसेच, फसवणूक केलेली संपूर्ण 60 कोटी रुपयांची रक्कम जमा करा, मग दोन्ही याचिकाकर्त्यांच्या परदेश दौऱ्याला परवानगी देण्याबाबत विचार करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले व प्रकरणाची सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी ठेवली.

...म्हणूनच अजून अटक नाही झालीये

याचिकाकर्ते राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीविरोधात 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना सवडीनुसार कुटुंबासह परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही, असेही मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने राज आणि शिल्पा यांना तातडीने दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले. यावेळी राज आणि शिल्पा यांच्यावतीने प्रत्येकवेळी चौकशीत सहकार्य केल्याचा दावा करण्यात आला. त्यावर, त्यांनी तपासात सहकार्य केले म्हणूनच त्यांना अद्याप अटक झाली नसल्याची आठवण न्यायालयाने करून दिली.

विमानतळावर दिसताक्षणी ताब्यात घ्या

पोलिसांनी या प्रकरणी राज आणि शिल्पा हे विमानतळावर दिसताक्षणीच त्यांना ताब्यात घेण्याबाबत नोटीस काढली आहे. तथापि, व्यावसायिक आणि कौटुंबिक कारणास्तव परदेशात जाता यावे यासाठी या नोटीसला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी शिल्पा आणि राज यांनी उच्च न्ययालयात धाव घेतली आहे. 

60 कोटींचं फसवणूक प्रकरण काय?

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकरण आहे. व्यवसायिक दीपक कोठारी याने आरोप केला आहे की, शिल्पा आणि राज यांच्या एका कंपनीत 60 कोटी रुपये गुंतवले. मात्र आता बंद पडलेल्या या कंपनीत 60 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप दीपक कोठारींनी केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शिल्पा शेट्टीची चार तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More