शिवसेनेचा भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल, कितीही काही केले तरी यश नाही!
शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने कितीही काहीही केले तरी त्यांना यात यश येणार नाही.
मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने कितीही काहीही केले तरी त्यांना यात यश येणार नाही. राजस्थान सरकार वाचविण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. त्यामुळे भाजपचे हसूच येत आहे, असे म्हणत जोरदार टोला लगावला आहे. राजस्थानमधील 'ऑपरेशन कमळ' फसले आहे. हा राजकीय विकृतीचा पराभव आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. त्याचवेळी बिहारमध्ये विकास अपयशी ठरला असेल तर राजकारणाच्या मदतीने अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा बनविण्याचा घाट घातला जात आहे, असा थेट हल्लाबोल सामना दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
राजस्थानमध्येही भाजपचा जीव अडकला आहे. मात्र, राजस्थान सरकार वाचविण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्ली येथे जाऊन प्रियंका-राहुल गांधींशी चर्चा केली. त्यानंतर पायलट माघारी आले. पायलट म्हणाले की, आम्ही काँग्रेसच्या हितासाठी काम करत राहू. राजस्थान विधानसभेचे अधिवेशन शुक्रवारपासून सुरु होत असून सरकार चालविण्यासाठी मुख्यमंत्री गहलोत यांना स्पष्ट बहुमत आहे.
भारतीय जनता पक्षाची सर्वात खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यांचे धोरण असे आहे की आमच्या विचारांचे सरकार नसेल तर आम्ही त्यांना काम करु देणार नाही. त्याचे सरकार चालवू देणार नाही. असे सरकार पाडू. मात्र, त्यांची राजकीय घमेंडीत अनेकदा सौदेबाजी होते. मात्र, बर्याचदा सौदेबाजी चुकते आणि शेअर बाजार कोसळतो. सचिन पायलटची बंडखोरी यशस्वी झाली नाही, कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांची मोठी संख्या गोळा करू शकले नाही. आणि अशोक गहलोत यांच्या चक्रव्यूहात भाजप काहीही करू शकला नाही, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
सत्ता आणि दबाव सहन करुन अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडण्याची तयारी करणाऱ्यांवर मात केली आहे. सरकार खाली पाडण्यासाठी भाजपने घेतलेल्या त्यांच्या 'उपाययोजनां'मुळे गहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार निरुपयोगी ठरवून सचिन पायलटची बंडखोरी यशस्वी होऊ दिली नाही. आता उर्वरित काम प्रियंका आणि राहुल गांधी यांनी दिल्लीत केले आहे. यामुळे मध्य प्रदेशात राजस्थानच्या रणांगणावर जे काही केले होते, ते भाजप राजस्थानमध्ये करू शकले नाही.
सचिन पायलट गेहलोतच्या तुलनेत कच्चा खेळाडू ठरले. म्हणजे पहाटे महाराष्ट्रात शपथ घेतल्यानंतरही सचिन पायलटच्या बाबतीतही अशीच गोष्ट दिसून आली. प्रत्येकवेळी पैसे आणि तपास यंत्रणा वापर करुन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न झाला. असं असले तरी विरोधी पक्ष सरकारे लोकशाहीत टिकू दायची नाहीत, असा प्रयत्न कशासाठी? भाजपचा महाराष्ट्रातही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि पाडण्याासाठी हालचाली होत आहेत. मात्र, ते त्यांना शक्य नाही. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला.
काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. 'सामना'तील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता? भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत.
बिहारमध्ये ‘विकास’ हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरु झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय, असा सवाल 'सामना'तून विचारण्यात आला आहे.