वारकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - अबू आझमी

अबू आझमींच्या या वक्तव्यानंतर प्रचंड वाद उफाळला...

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 24, 2025, 09:49 PM IST
वारकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - अबू आझमी

ब्युरो रिपोर्ट झी २४ तास : पंढरपूरच्या वारीबाबतच्या वक्तव्यावर सपाचे आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. वारकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं आझमींनी म्हटलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा आल्याचा दावा अबू आझमींनी केला आहे. वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो असं आझमींनी म्हटलं आहे.

अबू आझमींच्या या वक्तव्यानंतर प्रचंड वाद उफाळला...वारक-यांसह राजकीय वर्तुळातूनही आझमींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आझमींवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर अखेर अबू आझमींना उपरती झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतलेल्या आझमींनी आता माफीनामा जारी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून आझमींनी समस्त वारक-यांची माफी मागितली आहे.

काय म्हणाले अबू आझमी?

- माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले.
- माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, माफी मागतो.
- कुणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता
- मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो
- वारीच्या परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो
- वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे
- मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता
- मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती
- सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते. अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता, असे आझमी यांनी म्हटलंय.

आधी वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि त्यावर वादंग निर्माण झालं की माफी मागायची, असा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे.  महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची समृद्ध परंपरा आहे. वारी आणि वारक-यांना कुठलाच जात किंवा धर्म नसतो. शिस्तबद्ध आणि योग्य नियोजनासाठी ओळखल्या जाणा-या वारीच्या परंपरेबद्दल आझमी बरळले. उशिरा का होईन आझमींना उपरती झाली आणि त्यांनी माफी मागितली आहे.