IIT Bomby मध्ये हेर? 14 दिवसांपासून लेक्चरमध्ये संशयित हलचाली, प्रोफेसरने I-Card विचारताच...

Security Breach At IIT Bombay: देशातील आघाडीच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 21, 2025, 09:43 AM IST
IIT Bomby मध्ये हेर? 14 दिवसांपासून लेक्चरमध्ये संशयित हलचाली, प्रोफेसरने I-Card विचारताच...
सध्या तो पवई पोलिसांच्या ताब्यात आहे (प्रातिनिधिक फोटो)

Security Breach At IIT Bombay: भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या 'आयआयटी बॉम्बे'मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तब्बल 14 दिवस 'आयआयटी बॉम्बे'च्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचे आढळून आलं आहे. या प्रकरणामुळे 'आयआयटी बॉम्बे'च्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथील 22 वर्षीय संशयित बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला 17 जून रोजी 'कॅम्पस सिक्युरिटी'ने अटक केली आणि नंतर त्याला पवई पोलिस स्टेशनकडे सोपवले. सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून तो संस्थेच्या कॅम्पसमध्ये कसा घुसला आणि रात्री तो कुठे राहिला याचा शोध घेतला जात आहे.

हेरगिरीचा संशय

अधिकारी आता या प्रकरणाला संभाव्य धोका मानत असून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे. आरोपी कोणावर पाळत ठेवत होता का? गुप्तचर कारवायांमध्ये तो सहभागी होता का? याचा तपास सुरू आहे. ही व्यक्ती मोठ्या नेटवर्कचा भाग असण्याची किंवा विशिष्ट सूचनांनुसार काम करण्याची शक्यता पोलिस नाकारत नसून त्यामुळे या प्रकरणात नवा गौप्यस्फोट होण्याची शक्यताही फेटाळता येत नाही.

आयकार्ड विचारलं तेव्हा पळून गेला

आयआयटी मुंबईच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 48 वर्षीय राहुल दत्ताराम पाटील हे 'बॉम्बे आयआयटी'चे कर्मचारी आहेत. तक्रारीनुसार, 4 जून रोजी सीआरईएसटी विभागातील अधिकारी शिल्पा कोटिक्कल यांनी आयआयटीची विद्यार्थी नसलेल्या संशयास्पद घुसखोरासंदर्भात शंका आली. त्यांनी या विद्यार्थ्याकडे आयडी मागितलं तेव्हा तो घटनास्थळावरून पळून गेला.

अखेर त्याला अटक

कोटिक्कल यांनी सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताची प्रतिमा शोधून काढण्यात यश मिळवले आणि आयआयटीच्या सुरक्षा क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) सोबत शेअर केले. सुरुवातीच्या प्रयत्नांनंतरही संशयित सापडला नाही. शोध सुरू होता, परंतु तो सापडला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, 17 जून रोजी दुपारी चार वाजता, कोटिक्कलने पुन्हा संशयिताला पाहिले. तो यावेळी लेक्चर हॉल एचएल 101 मध्ये बसला होता. तो विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा क्यूआरटी गार्ड किशोर कुंभार आणि श्याम घोडविंदे यांनी तातडीने कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले.

अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहिला

पाटील यांनी केलेल्या चौकशीदरम्यान, गार्डच्या मदतीने संशयिताने स्वतःची ओळख बिलाल तेली म्हणून करून दिली आणि 2 ते 7 जून ते 10 ते १७ जूनदरम्यान अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहिल्याची कबुली दिली. कॅम्पसमध्ये सुमारे 13 हजार पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीचे विद्यार्थी राहतात.

गुप्तचर संस्थांना कळवलं

पवई पोलिसांनी आयआयटी पवई कॅम्पसमधून संशयिताला ताब्यात घेतले आहे. दोन आठवड्यांपासून कॅम्पसमध्ये राहणारा, शैक्षणिक इमारती आणि वसतिगृहांमध्ये अज्ञातपणे प्रवेश करणारी अशी व्यक्ती कॅम्पसमध्ये सापडणे हा एक मोठा धक्का आहे. त्याची पार्श्वभूमी, हेतू आणि तो कोणाशी संबंधित आहे याची कसून चौकशी केली जात आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. संशयित सध्या ताब्यात आहे आणि गुप्तचर संस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी सतर्क करण्यात आले आहे.

550 एकर कॅम्पस

बिलालच्या कॅम्पसमध्ये अनधिकृत प्रवेशामागील हेतू सध्या अधिकारी तपासत आहेत. त्याने कोणाशी संपर्क साधला आणि त्याचे हेतू काय होते याचा तपास तपासकर्ते करत आहेत. तो एखाद्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पसमध्ये घुसला असावा आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळला असावा. 550 एकर कॅम्पसच्या सीमेचा एक भाग पवई तलावाजवळ आहे. अधिकारी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.