धक्कादायक! सिक्युरिटी गार्डने महिलेला 20 व्या मजल्यावरून ढकललं, पण...

मुंबईत (Mumbai News) धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार घडला आहे. 

Updated: Jul 30, 2022, 08:03 PM IST
धक्कादायक! सिक्युरिटी गार्डने महिलेला 20 व्या मजल्यावरून ढकललं, पण... title=

1गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत (Mumbai News) धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार घडला आहे. एका माथेफिरू सेक्युरिटी गार्डने घरकाम करणाऱ्या महिलेला इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन ढकललं आहे. कामाच्या शोधात गेलेल्या या महिलेसोबत नराधम वॉचमॅनने हे कृत्य केलंय. दरम्यान  सुदैवाने आणि पोलीस आणि अग्निशमन दलाच्या हुशारीमुळे या महिलेचा जीव वाचलाय. महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सेक्युरिटी गार्डने असं का केलं, याचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जात आहे. (security guard throw women from 20th floor of building at malad)

नक्की काय घडलं?

मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये ही सर्व घटना घडलीय. 

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुरुवारी सकाळी साडे आठला इमारतीमध्ये कामासाठी गेली. महिलेने ए आणि बी या दोन्ही विंगमधील नेहमीप्रमाणे कामं पूर्ण केली. 

यानंतर ती महिला कामासाठी पुन्हा ए विंगमध्ये निघाली. तेव्हा या माथेफिरू सिंग नावाच्या सुरक्षारक्षकाने महिलेला थांबवलं.  ए विंगच्या 20 व्या मजल्यावर फ्लॅट नंबर 2001 मध्ये नवीन मॅडम राहायला आल्यात. त्यांना घरकाम करणारी बाई पाहिजे, असं या सिंगने महिलेला सांगितलं.

त्यानुसार ती महिला सुरक्षारक्षकासोबत 20 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या दिशेने निघाली. या दरम्यान सुरक्षारक्षकाने हे एका दिवसाचे काम आहे. तुला या कामाचे  3 हजार रुपये मिळतील, असं त्या सुरक्षारक्षकाने सांगितलं. 

त्यावर 'मला फिक्स काम हवंय, असं त्या महिलेने सुरक्षारक्षकाला सांगितलं. यावर तू स्वतः बोलून घे असं, सुरक्षारक्षक म्हणाला. अठराव्या मजल्यावर पोहोचताच सुरक्षारक्षकाने त्या  मॅडमला फोन केला. मात्र मला घरी यायला अर्धा तास लागेल. पण गच्चीवर माझ्या मुलाचे कपडे ठेवलेत. ते कपडे त्या महिलेला घेऊन जायला सांग, असा निरोप त्या मॅडमने सुरक्षारक्षकाला दिला.

मॅडमने दिलेला निरोप सुरक्षरक्षकाने त्या महिलेला दिला. त्यानुसार ती महिला गच्चीच्या दिशेने गेली. याचाच फायदा घेत हा सुरक्षारक्षक तिच्या मागे गेला. सुरक्षारक्षकाने त्या पीडितेचा मागून गळा आवळला आणि खाली पाडलं.

या झटापटीत महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्या सुरक्षा रक्षकाने पीडितेला उचललं. विसाव्या मजल्याच्या गच्चीवरुन खाली फेकलं आणि तिथून पोबारा केला. विसाव्या मजल्यावरुन खाली फेकल्याने ती महिला थेट अठराव्या मजल्यावरील गच्चीवर येऊन पडली.

या सर्व प्रकाराची माहिती इमारतीतील इतरांना समजली. त्यांनी वेळ न दवडता हा सर्व प्रकार पोलिसांना कळवला. पोलीसही शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अठराव्या  मजल्यावर अडकेल्या या महिलेला सुखरुप गच्चीतून बाहेर काढलं. 

पीडित महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तर पोलिसांनी या विकृत सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतलंय. या महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.