मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 'अबकी बार २२०' असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचा निर्णय मान्य करत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यंदाचे निकाल पाहता लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता येते, सत्ता जाते. मात्र, आपण कायम जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर लोकांकडून स्वागत होतेच असे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत जनतेने काही अपवाद सोडले तर पक्षांतर केलेल्यांना पाठिंबा दिलेला नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


यावेळी पवारांनी सातारा लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या वाटेवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनाही टोला लगावला. साताऱ्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. सातारच्या गादीबद्दल लोकांना आदर आहे. मात्र, गादीची प्रतिष्ठाच न ठेवण्याची भूमिका घेतली तर लोक काय करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले. यासाठी मी सातारच्या जनतेचे आभार मानतो, असे पवारांनी सांगितले. 


दिवाळी झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊ, असे पवारांनी सांगितले. तसेच आगामी काळात पक्ष उभारणी आणि नवीन नेतृत्त्व उभे करण्याचा कार्यक्रम अधिक व्यापक स्तरावर हाती घेऊ, असे पवारांनी म्हटले. 


सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. १६४ जागा लढवणाऱ्या भाजपला १०० जागांपर्यंतच समाधान मानावे लागू शकते. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. सध्या काँग्रेस ३८ तर राष्ट्रवादी ५४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपने केलेला एकतर्फी विजयाचा दावा फोल ठरला आहे.