मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ८० लाखांचा निधी कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आला. या निधीची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत वायबी सेंटरमध्ये पवारांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यासह देशभरातून अनेक कार्यकर्ते आणि नेते पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.


मुख्यमंत्री आणि ठाकरे कुटूंबियांकडून पवारांना शुभेच्छा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते. 


पवार कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केलं. पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या आणि पुत्र असं कुटुंबही यावेळी उपस्थित होते. 


या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. तब्बल तासभर ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. 


सरकारच्या खातेवाटपाबाबत तसंच मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराबाबत ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचं समजतं.