दिनेश दुखंडे, मुंबई : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतशी शिवसेना आणि भाजपमधील कटुता कमी होण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं आहे. लोकसभेसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढल्यास केंद्रात संख्याबळ वाढण्याचीच शक्यता आहे. शिवसेना युतीचा पत्ता कधी आणि कसा जाहीर करणार, याचं मात्र औत्सुक्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांना राम मंदिराची तारीख विचारणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांना लोकसभा निवडणुकीच्या केंद्रीय मुद्द्याचा अंदाज सर्वप्रथम आला. उद्धव या़ंच्या अयोध्या दौऱ्याला प्रसिद्धी तर मिळालीच त्याचबरोबर भाजपचा आणि संघपरिवाराचा राममंदिराचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला. यातून शिवसेना आणि भाजपातील संबंध पुन्हा सुधारु लागल्याची चर्चा आहे.. 


गेल्या आठ दिवसांत यात भर म्हणून नाणार भूसंपादनाला सरकारने स्थगिती दिली, त्याचबरोबर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेला संधी देण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दाही मार्गी लागताना दिसू लागला आहे. त्यातच विकासकामांच्या शुभारंभाच्या निमित्तानं वारंवार उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर उपस्थिती लावताना दिसत आहेत. शिवसेनेसोबतच जिंकू असे संकेत मुख्यमंत्र्यांनीही दिले आहेत.


दुसरीकडे सरकारमध्ये राहून विरोधकांच्या भूमिकेत असलेली शिवसेना याबाबत आत्ताच उघडपणे काही बोलायला तयार नाहीये. योग्य टायमिंग आणि योग्य ते पदरात घेवूनच ते याबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 


लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप संघर्ष भाजपला पुढच्या राजकारणासाठी परवडणारा नाही. आत्तापर्यंतच्या झालेल्या जनमतचाचण्यात युती झाल्यास महाराष्ट्रात ३५ ते ४० जागी युतीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली तर उद्धव यांचा अयोध्या दौरा ही त्याचीच नांदी मानायला हवी. मात्र दुसरीकडे शिवसेना नेमका निर्णय कधी आणि काय घेणार, याच्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.