मुंबईत शिवशाहीचा थरार... दादर-पुणे बसमधले 28 जण थोडक्यात वाचले! चालक ठरला हिरो; नक्की घडलं काय?

Shocking News Dadar To Pune Shivshahi Bus: एसटी महामंडळातील सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे शिवशाहीचे आहे असं विविध अहवालांतून हे समोर आले आहे. या अपघातामध्ये शनिवारी एका नव्या अपघाताची भर पडल्याचं दिसून आलं. हा सारा प्रकार मुंबईतील माटुंग्यासारख्या गजबजाट असलेल्या भागात घडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 9, 2025, 07:07 AM IST
मुंबईत शिवशाहीचा थरार... दादर-पुणे बसमधले 28 जण थोडक्यात वाचले! चालक ठरला हिरो; नक्की घडलं काय?
हादरवणारा प्रकार सायंकाळी घडला (प्रातिनिधिक फोटो)

Shocking News Dadar To Pune Shivshahi Bus: शनिवारी (8 नोव्हेंबर 2025) सायंकाळच्या सुमारास माटुंगा पुलावर शिवशाहीने प्रवास करणाऱ्या 28 जणांचा जीव थोडक्यात वाचला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांचा जीव वाचला. बस पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी बसच्या एसी डक्टमध्ये शॉर्टसर्किट होऊन त्यातून धूर येऊ लागला. बसमध्ये धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चालकाने सतर्कता दाखवून, आपत्कालीन दरवाज्याची काच फोडली आणि प्रवाशांना बाहेर काढले. बस चालक आणि बसमधील 28 प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाद्वारे सांगण्यात आले. 

Add Zee News as a Preferred Source

नेमक्या कोणत्या बसमध्ये घडली ही घटना?

शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दादर ते पुणे शिवशाही बस 28 प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. ही बस सायंकाळी सहा वाजता माटुंगा पुलावर आली असता, बसच्या मागील बाजूच्या एसी डक्टमधून धूर येऊ लागला. बसमधील प्रवासी भयभीत झाले. काही प्रवाशांना आग लागल्याची जाणवले. प्रवाशांनी याबाबत चालकाला माहिती दिली. एसी डक्टमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली.

अनेकजण मुख्य दाराने पडले बाहेर

प्रवाशांना धूराचा त्रास होऊ लागल्याने आणि चालकाने प्रसंगावधान राखत, आपत्कालीन दरवाज्याची काच फोडली. यातून बसमधील दोन ते तीन प्रवासी बाहेर काढले. तर, बाकीचे प्रवासी शिवशाही बसच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. या घटनेत बसमधील प्रवासी आणि चालकाला दुखापत झाली नाही. या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसगाडीने पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. एसी फ्युज सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर आला, असे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.

सर्वाधिक अपघात 'शिवशाही'चे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) 'शिवशाही' बसच्या अपघातांची आकडेवारी (Shivshahi bus accident statistics) थक्क करणारी आहे. एसटी महामंडळातील सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे शिवशाहीचे आहे असं विविध अहवालांतून हे समोर आले आहे. 2017 ते 2019 च्या आकडेवारीदरम्यान बोलायचं झाल्यास या कालावधीत 'शिवशाही'चे सुमारे 1,075 अपघात झाले होते. या अपघातांमध्ये 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि 367 प्रवासी जखमी झाले होते. 2018 मध्ये, केवळ ठाणे विभागात वर्षभरात 'शिवशाही' बसचे 26 अपघात झाले होते, त्यापैकी 20 अपघात एसटीच्या मालकीच्या आणि 6 कंत्राटी बसचे होते. नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात 'शिवशाही' बसचा भीषण अपघात झाला होता, ज्यात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 23 हून अधिक लोक जखमी झाले होते. यापैकी अनेक अपघातांसाठी चालकांची चुकीची पद्धत, तांत्रिक समस्या (उदा. ब्रेक निकामी होणे, एसी युनिटमधून धूर येणे), आणि खराब रस्ते परिस्थिती कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More