बापासाठी कायपण.... मुलगा आणि मुलीकडून वडिलांसाठी यकृत-किडनीचे दान
परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नरेंद्र वेगाड यांच्यावर एकाच वेळी यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई: हल्लीच्या काळात मुलांकडून वृद्धापकाळी पालकांना वाऱ्यावर सोडण्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येतात. मात्र, मुंबईतील एका कुटुंबातील दोन भावंडांनी आपल्या वडिलांसाठी त्याग करून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. नेहा व सागर वेगाड अशी त्यांची नावे आहेत. या बहीण-भावाने आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी अनुक्रमे स्वत:चे यकृती आणि किडनी दान केली.
नरेंद्र वेगाड यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आजार जडला होता. एनएएफएलडीने गंभीर स्वरुप प्राप्त केले की स्टिटोहेपटायटिस होतो. यात यकृताला सूज येते आणि पेशींना इजा पोहोचते.
एनएएसएचमुळे फायब्रॉसिस आणि नंतर सिऱ्हॉसिस होऊ शकतो. याशिवाय, त्यांना मूत्रपिंडाचीही समस्या होती. त्यामुळे नरेंद्र वेगाड यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक होते. अशावेळी त्यांच्या मुलांनी थोडाही विचार न करता आपले अवयव वडिलांना द्यायाचा निर्णय घेतला.
२२ वर्षीय सागर वेगाडने आपल्या वडिलांना यकृताचा काही भाग दान करण्याचे ठरविले. त्याचे वजन ९१ किलो होते. त्याच्या वडिलांना चरबीयुक्त यकृतामुळे यकृताचा सिऱ्हॉसिस झाला होता.
सागरची तपासणी केल्यानंतर त्याच्या यकृतात अतिरिक्त चरबी असल्याचे आढळून आले आणि तो वडिलांना यकृताचा भाग दान करण्यास अपात्र ठरला.
इतर कोणताही दाता उपलब्ध नसल्याने सागरने आपल्या वडिलांना नवसंजीवनी देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत यकृताचा भाग दान करण्याचे ठरविले.
प्रत्यारोपण करणाऱ्या टीमने आणि आहारतज्ज्ञांनी त्याला अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहाराचे पथ्य पाळण्यास आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
योग्य मार्गदर्शनाने आणि डॉ. शहा व त्यांच्या टीमशी फॉलोअप केल्यानंतर सागरने ४५ दिवसांत २० किलो वजन कमी केले आणि आपल्या वडिलांना यकृताचा भाग दान करण्यास त्याला पात्र ठरविण्यात आले.
दुसरीकडे त्याची बहीण नेहा हिने आपल्या वडिलांना नवसंजीवनी देण्यासाठी मूत्रपिंडाचे दान केले.
परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नरेंद्र वेगाड यांच्यावर एकाच वेळी यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.